नियोजनातील विषय...सावकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:57 AM2021-01-13T04:57:53+5:302021-01-13T04:57:53+5:30
नोंदणीकृत २८५ सावकार : हातकणंगले, शिरोळमध्ये सर्वाधिक शेतकरी सावकारांकडे अडकले राजाराम लोंढे , लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर ...
नोंदणीकृत २८५ सावकार : हातकणंगले, शिरोळमध्ये सर्वाधिक शेतकरी सावकारांकडे अडकले
राजाराम लोंढे , लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात नोंदणीकृत २८५ सावकार कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून व्यापारी, बिगरव्यापारी व शेतकऱ्यांना २३ कोटी ३ लाख रुपयांचे कर्ज दिलेले आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी ६७ लाख ४४ हजार कर्ज दिले असून, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात सर्वाधिक शेतकरी सावकारांकडे अडकले आहेत.
सहकाराची पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. येथे सहकाराचे जाळे विणले असून, त्या माध्यमातून सामान्य माणसाला आर्थिक हातभार लागतो. येथील बहुतांशी संस्था या सक्षमपणे सुरू आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास संस्था शेतकऱ्यांना पीक कर्ज, मध्यम मुदत कर्जाचे वाटप करतात. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत येथे सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. येथे रोखीची सावकारी, भिशी, जमीन, वाहन तारण अशा चलमालमत्ता स्वरूपात सावकारी चालते. जिल्ह्यात २८५ नोंदणीकृत सावकार आहेत. या सावकारांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना २१ कोटी ९३ लाख ३५ हजारांचे कर्ज दिले आहे. बिगर व्यापाऱ्यांना ४२ लाख ७० हजार कर्ज वाटप केले आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना ६७ लाख ४४ हजार रुपयांचे कर्ज दिलेले आहे.
अनधिकृत सावकारांवर सर्वाधिक छापे
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी ३७ अनधिकृत सावकारांवर छापे टाकले आहेत. त्यातील १२ जणांवर गुन्हे दाखल केले असून, त्यातून चारचाकी, १०० कोरे बॉन्ड, २५० धनादेश सापडले आहेत. वर्षभरातील राज्याच्या तुलनेत हे सर्वाधिक छापे आहेत.
सावकारांनी शेतकऱ्यांना वाटप केलेले कर्ज
तालुका कर्जवाटप
करवीर ६.५० लाख
गडहिंग्लज ७.५० लाख
आजरा ६० हजार
भुदरगड ०
चंदगड ०
शाहूवाडी ७० हजार
राधानगरी ०
पन्हाळा ४० हजार
गगनबावडा ०
हातकणंगले २७.०८ लाख
शिरोळ २२.५६ लाख
कागल २.१० लाख
---------------------------
एकूण ६७.४४ लाख
अधिकृत सावकारांचे व्याज
शेतकऱ्यांना तारणावर वार्षिक ९ टक्के व्याजदराने कर्ज द्यायचे आहे. बिगरतारण कर्जासाठी १२ टक्के, तर बिगरतारण शेती कर्ज १५ टक्के वार्षिक व्याजदराने द्यायचे आहे. बिगर कृषी बिगर तारण कर्जाला १८ टक्के व्याज आकारायचे आहे.