नियोजनातील विषय: अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:47+5:302021-05-27T04:26:47+5:30
कोल्हापूर: प्रमाणित बियाणे बिजोत्पादन व वाटपासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून यावर्षीपासून शेतकरी निवडीची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलद्वारे ...
कोल्हापूर: प्रमाणित बियाणे बिजोत्पादन व वाटपासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून यावर्षीपासून शेतकरी निवडीची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलद्वारे नोंदणी करत जिल्ह्यातील ११०३ शेतकऱ्यांनी चांगल्या बियाणांच्या प्रसार मोहिमेत आपला सहभाग नोंदवला आहे, पण अद्याप निवड यादी प्रसिद्ध झालेली नसल्याने हे अनुदानित बियाणे कधी मिळणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पायाभूत बियाणे निर्मिती व यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुदानित बियाणांसाठी अर्ज करण्याची सुविधा कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली होती. सोमवारी (दि. २५) याची अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. यावर्षी कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी आधीपासून या योजनेवर भर दिला आहे.
या योजनेंतर्गत सोयाबीन, भात, नाचणी यांच्यासह बाजरी, तूर, मूग, उडीद, मका, वाटाणा या पिकांचे प्रमाणित बियाणे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. जेेणेकरुन चांगल्या बियाणांचे स्थानिक प्रदेशात उत्पादन होऊन त्याचा प्रसार होऊन उत्पादनातही वाढ व्हावी हा त्यामागील उद्देश आहे.
जिल्ह्यातून आलेले अर्ज : ११०३कोणत्या योजनेसाठी किती अर्ज (पॉईंटर्स)
अ -संशोधित बियाणे :३३३
ब -प्रात्यक्षिक: ६१८
क -आंतरपिकातील प्रात्यक्षिक: ४३
ड- मिनी किट: ९
सर्वाधिक अर्ज प्रात्यक्षिक शेतीसाठी (बॉक्स)
महाडीबीटी पोर्टलवर सर्वाधिक ६१८ अर्ज प्रात्यक्षिक योजनेसाठी आले आहेत. यात ज्वारी, मूग, नाचणी, भात या पिकांचा समावेश आहे.
चौकट
एसएमएस आला तरच मिळणार अनुदानित बियाणे
हे अनुदानित बियाणे सरकारच्या बीज उत्पादक कंपन्यांकडून १०ते २० टक्के कमी किमतीत शेतकऱ्यांना पुरवले जाते. अर्ज केल्यानंतर यात निवड झाल्यानंतर एसएमएस येतो, त्यानंतर प्रत्यक्षात हे बियाणे संबंधित शेतकऱ्यापर्यंत पोहोचवले जाते.
प्रतिक्रिया
सोडत काढल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना एसएमएस येईल त्यांनाच अनुदानित बियाणे मिळणार आहे. आता अर्ज मागणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याची छाननी सुरु आहे. सोडत निघाल्यानंतर निवडलेल्या शेतकऱ्यांना बियाणे दिले जाणार आहे.
ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
चौकट
आंतरपिकासाठीही मागणी
आंतरपिकातील प्रात्यक्षिकामध्येही मका आणि साेयाबीन, मका आणि तूर, वाटाणा आणि सोयाबीन अशा पीक पद्धतीसाठी ४३ शेतकऱ्यांनी बियाणांची मागणी नोंदवली आहे. यात विशेष करून हातकणंगले, करवीर, पन्हाळा, गडहिंग्लज,आजरा,कागल येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे.