चिमुकल्यांची वनस्पती रंगांची उधळण
By Admin | Published: March 16, 2017 12:55 AM2017-03-16T00:55:37+5:302017-03-16T00:55:37+5:30
निसर्गमित्र, नाईस प्ले ग्रुपचे आयोजन : रासायनिक रंग टाळून रंगपंचमी
कोल्हापूर : कोणी बनले वाघ, कोणी हत्ती, तर काही फुलपांखरु बनले. वनस्पती रंगांची उधळण करीत चिमुकल्यांनी आणि त्यांच्या पालकांनी बुधवारी मंगळवार पेठेतील बेलबाग येथे रंगपंचमी साजरी केली. निमित्त होते, निसर्गमित्र व नाईस प्ले गु्रपद्वारे घेतलेल्या रंगपंचमी स्पर्धेचे. रासायनिक रंग किती घातक आहेत, पाण्याचा अपव्यय टाळा, झाडे जगवा असा संदेश देत वनस्पती रंगांची ही उधळण झाली.
रंगपंचमीमध्ये धम्माल करा, पण रासायनिक रंगांमुळे होणारे घातक परिणाम समोर ठेवून वनस्पती रंगांचा वापर करा, असा संदेश देत रंगपंचमी जल्लोषात साजरी झाली. वनस्पतिजन्य पदार्थांपासून तयार केलेल्या रंगांनी ‘चेहरा व शरीर रंगवा’ या स्पर्धेत चिमुकले रंगून गेले. पालकांनी घरी बनविलेल्या नैसर्गिक रंगाने चिमुकल्यांनी चेहरा रंगवत ‘पर्यावरण वाचवा’चा संदेश दिला.
काहीजण चेहऱ्यावर, अंगावर रंग रेखाटत वाघ बनले; काहीजण हत्ती बनले, तर काहींनी फुलपाखरांची रंगसंगती चेहऱ्यावर रेखाटून आनंद व्यक्त केला. अनेकांनी पाणी वाचवा, झाडे जगवा, झाडे लावा, कॅशलेस अशी अनेक घोषवाक्ये रंगातून अंगावर रेखाटली होती. प्रत्येकाला मिळालेल्या तासाच्या मर्यादित वेळेत पालकांनी मुलांच्या अंगावर रंग रेखाटले. त्यात काही पालकांनीही रंगपंचमी खेळण्याचा आनंद लुटला. दोन गटांत झालेल्या या स्पर्धेत ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सलग नवव्या वर्षी झालेल्या या उपक्रमावेळी ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगुले यांनी पर्यावरणपूरक सणांची गरज व नैसर्गिक रंगांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन प्रेमा श्रीखंडे, वनिता चव्हाण, प्रवरा पित्रे, राणिता चौगुले, अभय कोटनीस, पराग केमकर यांनी केले होते. (प्रतिनिधी)
रंगांची निर्मिती
नैसर्गिक रंगांची निर्मिती ही स्पर्धकांनी घरीच केली होती. पालकांनी घरी उरलेल्या शिळ्या भाज्या, पाने व निर्माल्यापासून विविध रंग तयार करण्यात आले होते. त्यामुळे घरी स्वत: बनविलेले नैसर्गिक रंग व बाहेरून घेतलेले नैसर्गिक रंग अशा दोन गटात स्पर्धा घेतली.
स्पर्धेत विजेते
स्पर्धेत पहिल्या गटात अनुक्रमे : प्रणित उदय साळोखे, कुशल अमोल जगदाळे, सिया संदीप खोत; तर दुसऱ्या खुल्या गटात : अगत्या अविनाश शिंदे, अजय पद्माकर राऊत, वरीश विक्रम चव्हाण. उत्तेजनार्थ सक्षम रमेश लोखंडे, भार्गवी मोहन कारेकर व सर्वेशा अनिल बडीगेर.
‘रासायनिक रंग टाळा व नैसर्गिक रंगांची रंगपंचमी खेळा’ असा संदेश देत निसर्गमित्र आणि नाईस प्ले गु्रपच्या वतीने बुधवारी मंगळवार पेठेतील बेलबाग येथे घेतलेल्या स्पर्धेत चिमुकली अशी रंगून सहभागी झाली होती.