हवामानातील बदल रोखण्यासाठी वृक्षारोपणाचा आधार
By admin | Published: March 23, 2015 12:09 AM2015-03-23T00:09:23+5:302015-03-23T00:43:14+5:30
बी. एस. मोहिते : कार्बन सिंक, ग्रीन पॅच वाढविण्याची गरज
कोल्हापूर : पर्यावरणाचे संतुलन आणि हवामानातील बदल रोखण्यासाठी वृक्षारोपण चळवळीचा एकमेव आधार आहे. ही चळवळ व्यापक करण्यासाठी समाजातील सर्व घटकांशी तिला जोडण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक व शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. बी. एस. मोहिते यांनी व्यक्त केले. ‘जागतिक हवामान दिना’निमित्त डॉ. मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना हवामान बदलाची सद्य:स्थिती मांडली.
डॉ. मोहिते म्हणाले, कोळसा, विजेचा वाढता वापर, वाहनांचे वाढते प्रमाण आणि झालेली औद्योगिक क्रांतीमुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढत आहे. गेल्यावर्षी जगात ७.५ बिलियन मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन झाले आहे. वातावरणातील उच्च सुरक्षित कार्बनचे प्रमाण (अप्पर सेफेश्ट लिमिट) हे ३५० पार्टस् पर मिलियन (पीपीएम) आहे. सुरक्षित स्वरूपातील हे पीपीएम जगाने गेल्या २५ वर्षांपूर्वीच ओलांडले आहे. आताच्या स्थिती पाहता दरवर्षी किमान तीन पीपीएम इतकी कार्बनची वाढ होत राहील. त्यामुळे वाढते प्रदूषण रोखले नाही तर आगामी २० ते २५ वर्षांत जगातील वातावरणातील कार्बनचे प्रमाण ४५० पीपीएमपर्यंत जाईल आणि ते सर्वांसाठी घातक ठरणारे आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी समुद्रातील रवाळ (कोरल्स्) टिकविणे, कार्बन सिंक, ग्रीन पॅच वाढविणे महत्त्वाचे ठरणारे आहे. हवामान बदलामुळे यंदाचे वर्षे आपत्तीचे आहे. त्याची सुरुवात अवकाळी पाऊस, गारपिटीने झाली आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढणार आहे. २०१५ मध्ये जुलैच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात मान्सून सुरू होईल, असा अंदाज आहे.
हवामानातील बदल यामुळे होतो...
ते म्हणाले, पृथ्वीच्या वातावरणाचा विचार करता पृष्ठभागाचे तापमान १७ डिग्री सेल्सियस इतके असते. या भागापासून १५ किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या भागाला ‘टोफ्रोस्फियर’, तर १५ ते ५० किलोमीटरपर्यंतच्या भागाला ‘स्ट्रोस्फियर’ म्हटले जाते. या दोन्हींच्या सीमारेषेला ‘ट्रोफोपॉज’ म्हणतात त्याचे तापमान मायनस ६० डिग्री सेल्सियस असते. सौरवारे ज्यावेळी ट्रोफोपॉजीशी इंटरअॅक्ट होतात. तापमानात बदल होऊन त्याचा परिणाम वातावरण, हवामान बदलावर होतो. त्यात अनेकदा गारा तयार होऊन गारपीट होते. वृक्षतोड, पाणीसाठे संपविणे अशा पद्धतीने पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्याची प्रक्रिया वर्षागणिक वाढत आहे. त्याचा मान्सून आदी स्वरुपात हवामान बदलांतून फटका बसत आहे.
तापमान वाढेल
गेल्या पाच वर्षांपर्यंत जागतिक तापमान साधारणत: एक डिग्री सेल्सियसने वाढले आहे. त्याचा परिणाम थर्मोलाईन करंटवर होत आहे. प्रदूषण वाढत राहिल्यास या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमान सहा ते सात डिग्रीने वाढण्याची शक्यता डॉ. मोहिते यांनी व्यक्त केली.
पर्यावरण संतुलनासाठी हे गरजेचे
पर्यावरणपूरक औद्योगिक विकास
हरितगृहांमधील वायूंचे उत्सर्जन रोखणे
जंगलतोड रोखून, वृक्षारोपणाचे प्रमाण वाढविणे