हा प्रयोग यशस्वी ठरल्यास रांगडे कोल्हापूर वैद्यकीय क्षेत्रातही आपली देशाला वेगळी ओळख देईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 01:33 PM2020-04-23T13:33:52+5:302020-04-23T13:36:27+5:30

सीपीआरमधील रक्त पेढीचे तंत्रज्ञ रमेश सावंत म्हणाले, 14 दिवसांच्या कालावधीनंतर कोरोना रूग्णाच्या स्वॅबची दोनवेळा पुन्हा तपासणी केली जाते. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अशा कोरोनामुक्त रूग्णाचा प्लाझ्मा घेण्यात येतो. सद्या घेतलेला प्लाझ्मा इतर तपासणी करून रक्त पेढीत संकलित करण्यात आला आहे.

Plasma therapy will be conducted for the first time in Kolhapur on severe corona patients | हा प्रयोग यशस्वी ठरल्यास रांगडे कोल्हापूर वैद्यकीय क्षेत्रातही आपली देशाला वेगळी ओळख देईल

हा प्रयोग यशस्वी ठरल्यास रांगडे कोल्हापूर वैद्यकीय क्षेत्रातही आपली देशाला वेगळी ओळख देईल

Next
ठळक मुद्देगंभीर कोरोना रूग्णांवर कोल्हापुरात प्रथमच होणार प्लाझ्मा थेरेपी

कोल्हापूर : कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या रूग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यात आला आहे. गंभीर,अत्यवस्थ कोरोना रूग्णांवर या प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत. राज्यात कोल्हापूरमध्ये बहुधा हा पहिलाच प्रयोग असावा. त्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.

पुण्याहून आलेला आणि जिल्ह्यात सापडलेला पहिला कोरोना रूग्ण 18 एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाला आहे. या कोरोनामुक्त झालेल्या युवकाच्या मान्यतेने त्याच्या रक्तातील 550 मिली प्लाझ्मा घेण्यात आला आहे. याबाबत या रूग्णावर उपचार करणारे आणि अथायू रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश पुराणिक यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, रोगमुक्त झालेल्या रूग्णाच्या शरीरामध्ये ॲन्टीबॉडीज तयार होतात. म्हणजे एखाद्या विषाणूने शरिरात प्रवेश केल्यावर शरिरातील सैनिक त्याच्याशी लढण्यासाठी सज्ज होतात. या कोरोनामुक्त झालेल्या रूग्णाच्या शरीरातून रक्त घेतलेल्या प्लाझ्मामध्ये या ॲन्टीबॉडीज आहेत. म्हणजे एखादा गंभीर रूग्ण असेल तर त्याच्या शरिरातील विषाणूसाठी अतिरिक्त सैनिकांची कुमक या प्लाझ्माच्या माध्यमातून तयार ठेवण्यात आली आहे. याच सैनिकांच्या बळावर अत्यवस्थ रूग्णाचा जीव आपण वाचवू शकतो.

सीपीआरमधील रक्त पेढीचे तंत्रज्ञ रमेश सावंत म्हणाले, 14 दिवसांच्या कालावधीनंतर कोरोना रूग्णाच्या स्वॅबची दोनवेळा पुन्हा तपासणी केली जाते. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अशा कोरोनामुक्त रूग्णाचा प्लाझ्मा घेण्यात येतो. सद्या घेतलेला प्लाझ्मा इतर तपासणी करून रक्त पेढीत संकलित करण्यात आला आहे. हा प्लाझ्मा आवश्यकतेनुसार रूग्णाच्या उपचारासाठी वापरण्यात येईल.

कोरोना बाधित गंभीर, अत्यवस्थ रूग्णावर प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी आयसीएमआरकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे, असे सांगून हिमॅटोलॉजिस्ट डॉ. वरूण बाफना म्हणाले, तातडीच्या वेळी या प्लाझ्माचा उपचारासाठी उपयोग करू शकतो. सद्या उपचार घेत असणाऱ्या रूग्णांच्या सहमतीने काहीजणांच्या रक्तातील प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. भविष्यात हा प्लाझ्मा अत्यवस्थ रूग्णांवर उपचार करण्यासाठी उपयोगी पडणार आहे.

प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून कोरोना बाधितांवर उपचार करण्याचा हा कोल्हापुरमधील राज्यातील पहिलाच प्रयोग असावा. तांबड्या-पांढऱ्यासाठी, गुळासाठी वा चप्पलेसाठी प्रसिध्द असणाऱ्या कोल्हापुरात हा प्लाझ्माचा प्रयोग यशस्वी ठरल्यास रांगडे कोल्हापूर वैद्यकीय क्षेत्रातही आपली देशाला वेगळी ओळख देईल.

 

 

Web Title: Plasma therapy will be conducted for the first time in Kolhapur on severe corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.