नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिरात प्लास्टिक बंदी
By admin | Published: October 7, 2015 12:51 AM2015-10-07T00:51:05+5:302015-10-07T00:51:18+5:30
जिल्हा प्रशासनाचा निर्णय : देवस्थानतर्फे प्रसाद वाटप होणार
कोल्हापूर : नवरात्रौत्सवादरम्यान अंबाबाई मंदिरात प्लास्टिकमुक्त उत्सव साजरा व्हावा यासाठी या कालावधीत प्लास्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे. नवरात्रौत्सवाचे नियोजन आणि सुरक्षेबाबत आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी हा निर्णय जाहीर केला. याशिवाय मंदिराच्या सुरक्षेसंबंधी सूचना केल्या. दरम्यान, प्रथमच यावर्षी देवस्थान तर्फे प्रसाद वाटप होणार आहे.नवरात्रौत्सवादरम्यान अंबाबाई मंदिरात राज्यासह आसपासच्या राज्यांमधून दहा ते बारा लाख भाविक दशर्नासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर बैठकीत मंदिराच्या आतील आणि बाहेरील सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी दिल्या आहेत. सीसीटीव्ही सुस्थितीत बसवणे, बॅरिकेट्स वाढवणे, दर्शनरांगेवरील मंडप वाढविणे आणि महिला भाविकांची संख्या अधिक असल्याने महिला पोलीस अधिकाऱ्यांसह महिला पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. रात्रीच्यावेळी मंदिर परिसरात पुरेसा प्रकाश असावा यासाठी हायमॅक्स दिव्यांची डागडुजी करण्यात आली आहे. भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पार्किंगची सुविधा, दर्शनरांगांचे नियोजन करण्याबरोबरच अग्निशमन दल, आरोग्य विभाग, आपत्कालीन यंत्रणेलाही दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.
मंदिरात उत्सवादरम्यान प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे प्लास्टिकमुक्त उत्सवाचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ओटीचे साहित्य, प्रसाद आणि पूजेचे इतर साहित्य प्लास्टिक पिशव्यांमधून विकले जाऊ नये यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. नवरात्रौत्सवादरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी परवानगी घेऊनच मंडप उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचदरम्यान मोहरम असल्याने या दोन्ही सणांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहावे आणि शांततेत सण-उत्सव पार पडावेत यासाठी सुरक्षेवर भर देण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर टोलनाक्यांच्या ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत.
यावेळी पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील, एस. एस. साळवी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
आज गाभारा बंद
अंबाबाई मंदिराचा गाभारा आज, बुधवारी स्वच्छ करण्यात येणार आहे. देवीच्या मूळ मूर्तीवर इरलं पांघरून गाभारा स्वच्छ केला जाईल. त्यामुळे मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. संध्याकाळी ७ नंतर मूर्ती पूर्ववत दर्शनासाठी खुली होईल.