प्लास्टिक बंदीचा झटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:28 AM2018-06-25T00:28:04+5:302018-06-25T00:28:12+5:30

Plastic ban shock! | प्लास्टिक बंदीचा झटका!

प्लास्टिक बंदीचा झटका!

googlenewsNext


कोल्हापूर : प्लास्टिकबंदीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी महानगरपालिकेने धडक कारवाई करत शहरातील सहा व्यापारी व दुकानदारांकडून ३० हजारांचा दंड वसूल केला. त्यांच्याकडून सुमारे ३० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या, तर महापालिकेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी १३ आरोग्य कार्यालयांमध्ये दिवसभरात ४५० किलो प्लास्टिक जमा केले.
महापालिकेने शनिवारी धडक कारवाई सुरू करूनही व्यापारी व दुकानदारांवर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. रविवारच्या कारवाईतही व्यापाºयांकडून प्लास्टिक जप्त करण्यात येऊन दंड वसूल करण्यात आला. दिवसभरात मंगळवार पेठेतील हंसराज स्वीट मार्ट, बिंदू चौकातील माधुरी बेकरी, उमा टॉकीज चौकातील गजानन बेकरी, राजारामपुरीतील जॅक अ‍ॅँड जिल शॉपी, शिवाजी चौकातील अंबिका स्वीट मार्ट, सलीम फरसाण मार्ट यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एकूण ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला तसेच सुमारे ३० किलो प्लास्टिकच्या पिशव्याही जप्त करण्यात आल्या.
एका बाजूला व्यापारी प्लास्टिक बंदीला सहकार्य करत नसले तरी नागरिकांनी यासाठी उत्स्फूर्तपणे सहकार्य दिले आहे. दिवसभरात शहरातील महापालिकेच्या १३ आरोग्य कार्यालयांमध्ये नागरिकांनी जवळपास ४५० किलो प्लास्टिकचे साहित्य आणून जमा केले. महापालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांकडून प्लास्टिक जमा करण्यास मिळालेला प्रतिसाद पाहता महापालिकेकडून शहरात प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी आज, सोमवारी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.
इचलकरंजीत अडीच लाखांचे प्लास्टिक जप्त
प्लास्टिक बंदीअंतर्गत रविवारी येथील नगरपालिकेच्या पथकाने पाच व्यापारी दुकानदारांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख रुपयांच्या प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू जप्त केल्या. तसेच २५ हजार रुपये दंड वसूल केला. नगरपालिकेने अचानकपणे केलेल्या कारवाईमुळे दुकानदारांची धावपळ उडाली.
सरकारने शनिवार (दि.२३) पासून प्लास्टिक बंदी लागू केली असली तरी इचलकरंजी नगरपालिकेने शनिवारी कारवाई केली नव्हती. रविवारी सुटीचा दिवस असूनही अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे व मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३० कर्मचाºयांच्या पथकाने अचानक कारवाई सुरू केली आणि ही वार्ता शहरात वाºयासारखी पसरल्यामुळे प्लास्टिक असलेल्या व्यापारी, दुकानदार, बेकरी अशा ठिकाणी खळबळ उडाली.
पथकाने सुरुवातीला जवाहर प्लास्टिक, त्यानंतर साळुंखे किराणा स्टोअर्स, काश्मीर बेकरी व कांबळे यांच्या दुकानात अचानक धाड टाकली. तेथे सुमारे २०० किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्या, ग्लास, थर्माकोलचे प्लेट असे साहित्य ताब्यात घेतले. या चौघांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे वीस हजार रुपये दंड वसूल केला.
त्यानंतर पथकाने अचानकपणे कागवाडे मळा येथे असलेल्या सालासार ट्रेडिंग कंपनी या होलसेल व किरकोळ प्लास्टिक थर्माकोल वस्तू विक्रीच्या दुकानावर धाड टाकली. या दुकानात असलेल्या प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंचा माल गायब झाला होता. मात्र, काही वेळाने दुकानापासून सुमारे ५०० फुटांवर असलेल्या गोदामावर कारवाई करण्यात आली. गोदामामध्ये प्लास्टिक पिशव्या, ग्लास, थर्माकोलच्या प्लेटस्, स्ट्रॉ, चमचे असे साहित्य आढळून आले. या साहित्याने नगरपालिकेकडील एक ट्रक अक्षरश: भरला गेला. ७०० किलो वजनाचे हे साहित्य असल्याची माहिती देण्यात आली. साहित्य जप्त करून त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Plastic ban shock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.