प्लास्टिकचे हँडग्लोव्हज, सेल संपलेले ऑक्सिमीटर... कसे तपासायचे माझे कुटुंब?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:38 PM2020-09-17T13:38:28+5:302020-09-17T13:40:54+5:30
घरी महिला केस रंगवताना वापरतात तसला हलक्या दर्जाचा प्लास्टिकचा हॅन्डग्लोव्ह, बॅटरी सेल संपलेले ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनर घेऊन ह्यआशाह्ण कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबांची तपासणी करीत आहेत. त्यातून कोरोना संशयित रुग्ण कसे हाताला लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोल्हापूर : घरी महिला केस रंगवताना वापरतात तसला हलक्या दर्जाचा प्लास्टिकचा हॅन्डग्लोव्ह, बॅटरी सेल संपलेले ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनर घेऊन ह्यआशाह्ण कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबांची तपासणी करीत आहेत. त्यातून कोरोना संशयित रुग्ण कसे हाताला लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य सरकारने मंगळवारपासून ह्यमाझे कुटुंब... माझी जबाबदारीह्ण ही मोहीम सुरू केली आहे. त्याअगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. ही कामे सध्या फक्त आशा कर्मचारीच करीत आहेत; परंतु त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही पुरेशी दक्षता घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यांना शासनाने हँडग्लोव्हज दिलेले नव्हते. त्याबद्दल वारंवार तक्रारी झाल्यानंतर आता त्याचा पुरवठा केला आहे; परंतु ते ग्लोव्हज घालून तपासणी कशी करायची? असाच प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.
केस रंगवताना वापरण्यात येणारे व हवेने उडून जाणारे हे ग्लोव्हज आहेत. ते घातले तर वारंवार हातातून निसटून पडतात. वापरून फेकून द्यायचे असल्याने त्यांचा दर्जाही तसाच आहे. असे ग्लोव्हज घालून आम्ही कशी तपासणी करायची? असा प्रश्न आशा कर्मचारी विचारत आहेत.
त्यांना तपासणीसाठी ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनर देण्यात आले आहेत; परंतु त्यांचे बॅटरी सेल संपलेले असतात. त्यामुळे त्या ते फक्त सोबत घेऊन जातात; पण प्रत्यक्षात त्याचा वापर करता येत नाही. परिणामी लोक सांगतील तीच माहिती भरून घेऊन ही तपासणी सुरु आहे. खरे तर ही तपासणी एकत्रित करायची आहे; परंतु अन्य विभागांचे कर्मचारी येत नसल्याने ती आशाच करीत आहेत.
आमच्या घरी मंगळवारी आशा कर्मचारी आल्या होत्या. त्यांच्याकडे ऑक्सिमीटर होते. परंतु त्यातील बॅटरी सेल संपलेला होता. त्यामुळे त्यांनी फक्त प्राथमिक माहिती विचारली. अशा पद्धतीने ही तपासणी मोहीम झाली तर त्यातून खरी माहिती बाहेर येणार नाही व रुग्णसंख्या वाढू शकते.
मारुती संकपाळ,
ज्येष्ठ नागरिक, मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर