कोल्हापुरात फुटबॉल सामन्यात खेळाडूंची फ्री-स्टाइल हाणामारी, पोलिसांकडून सौम्य लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:38 IST2025-03-31T13:38:10+5:302025-03-31T13:38:56+5:30

प्रचंड तणाव, समर्थकांची हुल्लडबाजी

Players of Patakad Talim Mandal and Shri Shivaji Tarun Mandal clash during a football match in Kolhapur | कोल्हापुरात फुटबॉल सामन्यात खेळाडूंची फ्री-स्टाइल हाणामारी, पोलिसांकडून सौम्य लाठीमार

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : श्री छत्रपती शाहू स्टेडियमवर रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळात झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंत वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यवसान मैदानातच खेळाडूंत फ्री-स्टाइल हाणामारीत झाले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन संतप्त खेळाडू आणि त्यांच्या समर्थकांना पांगिवले. सुमारे १० मिनिटे हा प्रकार सुरू होता. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

उत्तरेश्वर चषक स्पर्धेतील अंतिम लढत पीटीएम आणि शिवाजी तरुण मंडळात असल्याने दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने मैदानात उपस्थित होते. गोल होईल तसे दोन्ही संघांचे समर्थक गॅलरीकडे पाहून शिवीगाळ करत होते .बाटल्या फेकत होते. सामन्यात शेवटची दहा मिनिटे शिल्लक राहिली असता दोन खेळाडूंत वादावादी सुरू झाली. हे पाहून दोन्ही संघांचे राखीव खेळाडू मैदानात धावले.

काहीजण वादावादी थांबविण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले अन् त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. याचवेळी काही राखीव खेळाडू आणि संघ व्यवस्थापक त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनीही हाणामारी करण्यास सुरुवात केली. काही समर्थकही मैदानात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला.

मैदानात हाणामारी आणि प्रेक्षक गॅलरीत शिवीगाळ असा प्रकार सुरू होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आणि संयोजकांनी धाव घेतली. त्यांनी हाणामारी करणाऱ्या खेळाडूना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. तरीही ते एकत नाहीत हे पाहून पोलिसांनी लाठीमार सुरू केला . एक खेळाडू तर शिवीगाळ करून बाजूला गेला. मात्र त्याच्यामुळे वाद आणखी चिघळल्याने त्याला पोलिसांनी चोपले. त्यामुळे संघातील खेळाडू चिडले.

पुन्हा पाच ते दहा मिनिटे वादावादी सुरू राहिली. त्यामुळे सामना काही वेळ थांबविण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पंचांनी दोन्ही संघांकडून सात-सात खेळाडूंवर सामना खेळविला. सामना संपेपर्यंत मैदानात आणि मैदानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला.

तब्बल ११ रेड आणि ४ येलो

सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या तब्बल ११ जणांना रेड कार्ड, तर चौघाजणांना येलो कार्ड पंचांनी दाखवले. यामध्ये 'पाटाकडील'च्या यश देवणे, ऋतुराज सूर्यवंशी, ऋषिकेश मेथे-पाटील, ओंकार मोरे, राखीव खेळाडू जय कामत, रोहित पवार यांना रेड, तर संघ व्यवस्थापक धनंजय जाधव, प्रशिक्षक सैफ हकीम आणि गोलरक्षक राजीव मिर्याल या तिघांना येलो कार्ड दाखविले. ‘शिवाजी'च्या करण चव्हाण-बंदरे, संकेत नितीन साळोखे, विशाल पाटील, सुयश हांडे, राखीव खेळाडू अमन सय्यद यांना रेड, तर अभिषेक देसाई याला यंलो कार्ड दाखविले.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

सामन्यादरम्यान झालेल्या गोंधळाच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यासाठी केएसए कार्यालयात जाऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. हाणामारी तसेच हुल्लडबाजीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

गॅलरीत पोलिस अन् शिवीगाळ

गॅलरीतील समर्थकांकडून होणाऱ्या हुल्लडबाजीला आळा बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरीमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांकडून प्रेक्षकांच्या हालचालींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जात होते. मात्र मैदानात वादावादी झाल्यानंतर पोलिसांसमोरच समर्थकांकडून अर्वाच्च शिवीगाळ सुरू होती. त्यांच्यासमोर पोलिसही हतबल झाले होते.

शेवटच्या क्षणी वाद

संघ सामना जिंकत असेल किंवा प्रतिस्पर्धी सामना हरत असेल त्या वेळी काही खेळाडूंकडून वाद निर्माण केले जात आहेत. यामुळे कोल्हापूरचाफुटबॉल किरकोळ कारणामुळे बदनाम होत आहेत, हा वाद कोण निर्माण करत आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी उपस्थित प्रेक्षकांकडून करण्यात आली.

Web Title: Players of Patakad Talim Mandal and Shri Shivaji Tarun Mandal clash during a football match in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.