आनंददायी शिक्षण देणारी शाळा
By Admin | Published: June 30, 2017 01:12 AM2017-06-30T01:12:09+5:302017-06-30T01:12:09+5:30
अभिमानास्पद : ‘शिष्यवृत्तीतील यशामुळे महापालिका शाळा राज्याच्या नकाशावर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पटसंख्या आणि शिक्षणाच्या दर्जामुळे महापालिकेच्या शाळांवर वारंवार टीका होत असते. मात्र, हा दृष्टिकोन फोल ठरवत टेंबलाईवाडी विद्यालय शाळा क्रं. ३३ या शाळेतील वर्धन माळीने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावून महानगरपालिकेतील शैक्षणिक गुणवत्तेची पोहोचपावती राज्याला दिली आहे.
महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण सुमार दर्जाचे मिळते असा गैरसमज असल्याने पालकांचा खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी ओढा असतो. त्यामुळेच महानगरपालिकेच्या शाळेत मोफत शिक्षण असूनसुद्धा कष्टकरी वर्गातील पालकही आपल्या पाल्यांना खासगी शाळांतून शिक्षण देण्यास प्राध्यान्य देऊ लागला आहे. मात्र, या सर्वांना मतांना छेद देत टेंबलाईवाडी विद्यालय या शाळांतील शिक्षकांच्या अथक परिश्रमातून व अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर दिल्याने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशामुळे महानगरपालिकेची ही शाळा आता राज्यातील नजरेत अव्वल ठरली आहे.
टेंबलाई विद्यालयात बहुतांशी विद्यार्थी हे सामान्य कुटुंबांतील व ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ज्ञानार्जनाबरोबर आनंददायी शिक्षणासाठी येथील शिक्षकांनी प्राध्यान्य देण्यास सुरुवात केली. शाळेत भौतिक सोयी-सुविधा निर्माण करतानाच ज्ञान घेण्यासाठी पूरक वातावरणनिर्मिती केली. महानगरपालिकेच्या शाळांविषयी जनसामान्यांच्या दृष्टिकोन बदलायचा असेल तर परिवर्तन महत्त्वाचे, हा विचार येथील शिक्षकांनी जाणला आणि मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक, शिपाई कामाला लागले आणि अवघ्या काही वर्षांत या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले. शाळेला भव्य क्रीडांगण, त्यामुळे क्रीडा स्पर्धांतूनही शाळा मागे नाही. या सर्व गोष्टींमुळे महानगरपालिकेच्या या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. काही पालकांनी इंग्रजी माध्यमातील खासगी शाळेतून काढून या शाळेत दाखल केले. त्यामुळे या शाळेची ६०० विद्यार्थ्यांची क्षमता असतानासुद्धा ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिले ते चौथीच्या तीन तुकड्या झाल्या आहेत. पटसंख्या वाढविण्यासह गुणवत्ता वाढविण्याकडे येथील शिक्षक काम करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते.
सुविधांकडे लक्ष
देणे गरजेचे
दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळेच शाळेची क्षमता ६०० असताना शाळेत ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे येथील वर्ग खोल्या व अन्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. शाळेतील वर्गखोल्यांसह, बेंच आणि इमारतीची डागडुजी करणे गरजे आहे. या प्राथमिक सुविधा पुरविण्याकडे महानगरपालिकेसह व दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास नक्कीच सामान्य कुटुंबीतील मुले आणखीन उभारी घेऊ शकतात.
यशाचे गमक....
शाळेतील शिक्षिका पुष्पा गायकवाड यांनी गेली वर्षभर एकही सुटी न घेता, मुलांना अभ्यासाची गोडी लावून शिष्यवृत्तीच्या अभ्यास मुलांच्याकडून करून घेतला. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्यासह राज्याच्या यादीत चौघे आणि जिल्ह्णाच्या गुणवत्ता यादीत सहाजण आले आहेत. दररोज सकाळी ९.३० ते ११ व सायंकाळी ५ ते ६, शनिवारी ११ ते २, रविवार सकाळी १० ते ५ या वेळेत त्या शिष्यवृत्तीचा अभ्यास घेत. घोंकपट्टीपेक्षा मुले स्वत: अभ्यास कसा करतील यावर त्यांनी भर दिला. त्यासोबत आत्मविश्वास वाढविणारे विविध पुस्तकांतील मुद्दे त्या मुलांना सांगत असल्याने या मुलांचाही आत्मविश्वास वाढल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
अर्धवट शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी
शाळेची स्थापना १९५३ मध्ये झाली आहे. पहिली ते सातवी इयत्ता असणाऱ्या या शाळेमध्ये सन २००८ मध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आली. यावेळी डिसेंबर- जानेवारीमध्ये शाळेतील शिक्षक आसपासच्या बालवाडी, अंगणवाडी येथे जाऊन मुलांची यादी घेऊन येत नंतर शिक्षकांचे गट करून येथील परिसरात जाऊन शाळेच्या उपक्रमांची माहिती देण्याचे काम करतात. शाळेत शासनाचा मोफत शिक्षणांच्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात, तसेच गरीब विद्यार्थ्यांची संमेलन फी, सहल फी किंवा त्यांना शिक्षणासाठी काही गरज लागल्यास येथील शिक्षक पुढाकार घेत असल्याने अर्धवट शिक्षण सोडण्याचे प्रमाण येथे कमी आहे.