खासगी जागा स्वच्छतेबाबत नोटिसा द्या : -आयुक्त कलशेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 01:09 AM2019-07-03T01:09:29+5:302019-07-03T01:11:21+5:30
खासगी जागेतील स्वच्छता करण्यासंदर्भात तसेच तेथील तणकट काढण्याकरिता संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावा; तसेच संबंधित मिळकतधारकाकडून कामाची पूर्तता न झाल्यास महापालिकेमार्फत स्वच्छता करून तिचा खर्च संबंधितांकडून वसूल
कोल्हापूर : खासगी जागेतील स्वच्छता करण्यासंदर्भात तसेच तेथील तणकट काढण्याकरिता संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावा; तसेच संबंधित मिळकतधारकाकडून कामाची पूर्तता न झाल्यास महापालिकेमार्फत स्वच्छता करून तिचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, असे निर्देश मंगळवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.
ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात आयुक्त कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाकडील सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षक यांची स्वच्छ भारत अभियान, नालेसफाई, ओ.डी.एफ. प्लस, आदी विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केलेली होती.
बैठकीमध्ये आयुक्त कलशेट्टी यांनी शहरातील पूर परिस्थितीबाबत माहिती घेतली. त्यानंतर सर्व आरोग्य निरीक्षक यांना शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करावेत, कंटेनरसभोवतालचा कचरा तातडीने उठाव करण्यासाठी विशेष पथक तयार करावे, शहरातील शौचालयांची नियमितपणे स्वच्छता करावी, शौचालयासभोवतालचा परिसराचे सुशोभीकरण करावे, अशा सूचना दिल्या. शहरातील सर्व तरुण मंडळे, धार्मिक मंडळे, भक्तांना महाप्रसाद अथवा अन्य धार्मिक कार्यांवेळी प्रसाद देण्याकरिता कागदी अथवा प्लास्टिक पत्रावळी, प्लेट, ग्लास, ताट, कप, आदी न वापरता स्टीलच्या प्लेट वापरण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना दिल्या.
झोपडपट्टी भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच झोपडपट्टी सुशोभीकरण करण्याकरिता नोडल आॅफिसर म्हणून अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, जल अभियंता, आरोग्याधिकारी, उपशहर अभियंता, मुख्य आरोग्य निरीक्षक, तसेच इतरही वरिष्ठ अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. आढावा बैठकीस उपायुक्त मंगेश शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते.
‘एक लाख १२ हजार घरफाळा बिलांचे वाटप’
कोल्हापूर : मनपा प्रशासनाकडून दि. १ जून ते २८ जूनपर्यंत एक लाख २७ हजार ७६० घरफाळा बिले पोस्टात वितरणाकरिता दिली, त्यापैकी एक लाख १२ हजार ६६१ घरफाळा बिले पोस्ट कार्यालयामार्फत वितरीत केली आहेत, अशी माहिती येथील डाकघरचे वरिष्ठ अधीक्षक ईश्वर पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
सन २०१६ पासून भारतीय डाक विभागामार्फत कोल्हापूर महानगरपालिकेची घरफाळा बिले स्पीड पोस्टाने वितरीत केली जात आहेत. डाक विभागामार्फत घरफाळा वितरीत करण्यास सुरुवात केल्यापासून महापालिकेच्या महसुलात भरीव वाढ झाली आहे, जी याआधी महापालिकेमार्फत घरफाळा वितरीत केली जात असताना होत नव्हती. डाक विभागाची विश्वासार्हता व पारदर्शकतेमुळे हे घरफाळा बिले वाटपाचे काम महानगरपालिकेने डाक विभागास सुपूर्द केले. गेल्या दोन वर्षांपासून आजतागायत डाक विभागाने बिले वाटपाचे काम अत्यंत गतीने वितरीत केले असून आजही त्याच गतीने केले जात आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.
१५ हजार ३७९ इतकी बिले वाटण्याचे काम प्रलंबित आहे. अपूर्ण पत्ते, मिळकतधारक मिळून न येणे या कारणांमुळेही बिले प्रलंबित राहिली असल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
कोल्हापूर शहरातील स्वच्छता तसेच संभाव्य पूरस्थितीबाबत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मंगेश शिंदे, विजय पाटील उपस्थित होते.