गरजवंतांच्या पाठीवर प्रतिज्ञा नाट्यरंगचा हात! : मिळालेल्या रकमेतून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:32 AM2018-11-07T00:32:21+5:302018-11-07T00:35:06+5:30
पैशांअभावी कुणाचे उपचार थांबलेत, कुणाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, कुणाला शिक्षणाची आस आहे, कोणी वृद्धत्त्वात हलाखीचे जीवन कंठत आहे, पतीच्या निधनानंतर
इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : पैशांअभावी कुणाचे उपचार थांबलेत, कुणाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, कुणाला शिक्षणाची आस आहे, कोणी वृद्धत्त्वात हलाखीचे जीवन कंठत आहे, पतीच्या निधनानंतर अनेक माउली धुणंभांडी करून संसाराचा गाडा पेलताहेत, काहीजणांच्या आयुष्यामागे लागलेले दारिद्र्याचे शुक्लकाष्ठ संपतच नाही.. अशा अनेक गरजवंत महिलांसाठी प्रतिज्ञा नाट्यरंगने मदतीचा हात पुढे केला आहे.
गेल्या १८ वर्षांत दानशुरांनी दिलेल्या अगदी १00 रुपयांपासून सुरू होणारी मदत छोटी दिसत असली, तरी डोंगराहून मोठी झाली आहे...प्रशांत जोशी यांच्या प्रतिज्ञा नाट्यरंगने २००० सालापासून कलेतून सामाजिक कार्याचे व्रत अखंडपणे सुरू ठेवले आहे. संस्थेच्या वतीने बालरंगभूमीसाठी विशेष काम केले जाते. नाटकाचे सादरीकरण करायचे आणि प्रेक्षकांना ऐच्छिक प्रवेश मूल्य ठेवायचे.
प्रेक्षक अगदी १0 रुपयांपासून शंभर-दोनशे रुपयांपर्यंत आपल्याला जमेल तेवढी रक्कम प्रवेशमूल्याच्या पेटीत टाकतात. याद्वारे वैद्यकीय, शिक्षण, अन्न-धान्य, दैनंदिन गरजा, कपडे, औषधपाणी अशा कोणत्याही स्वरूपाची गरज असूदे, प्रतिज्ञा नाट्यरंग ती पूर्ण करते. प्रतिज्ञा नाट्यरंगचे प्रशांत जोशी, सतीश साळोखे, मदन काकडे यांच्यासह बाळासाहेब कदम, अमोद दंडगे, प्रवीण लिंबड, आम्रपाली क्षीरसागर, विवेक कमलाकर, ऐश्वर्या बेहेरे, डॉ. अंजली पाठक, डॉ. आनंद ढवळे, दिलीप अहुजा, नारायण इंदुरीकर, विवेक साबळे, अनिता पाटील, अमित टिकेकर, प्रफुल्ल गायकवाड अशा अनेक दानशुरांचे हात या सेवाव्रतात सहभागी आहेत.
नवरात्रौत्सवापासून माणुसकीचा जागर
हे सेवाभावी काम करत असताना शारदीय नवरात्रौत्सवात रोज एका गरजू महिलेला मदत करण्याचा संकल्प करण्यात आला. पहिल्या माळेला सुरू झालेला हा माणुसकीचा जागर आता दिवाळीपर्यंत अव्याहतपणे चालू आहे. रोज जमा होईल तेवढी रक्कम कुटुंबाचा गाडा एकटीने ओढत असलेल्या अत्यंत गरजू व होतकरू महिलेला तिच्या घरी जाऊन दिली जाते. ही रक्कम एक हजार रुपयांपासून अडीच हजारांपर्यंत आहे. नवरात्रौत्सवापासून आजपर्यंत २७ महिलांना हे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.
गरजूंना मदत..
गेल्या १८ वर्षांत प्रतिज्ञा नाट्यरंगने ३२५ गरजूंना मदत केली आहे. नाटक, गान मैफल, विविध व्यक्ती संस्थांचे नृत्य अशा विविध कलांच्या माध्यमातून जवळपास १० लाखांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.
सोशल मीडियाद्वारेही मदत
प्रतिज्ञा नाट्यरंगच्या कामाची माहिती व रोज केले जाणारे अर्थसाहाय्य याची माहिती व्हॉटस अॅप, फेसबुकसारख्या माध्यमातून व्हायरल होत आहे. गरजूची माहिती व दुरध्वनी क्रमांक त्यात दिलेला असतो, त्यामुळे मदत थेट गरजू महिलेपर्यंत पोहोचते; त्यामुळे सागर बगाडे यांच्या केवायफोरएच, आम्ही कोल्हापुरी, अशा विविध संस्था, ग्रुपनेही मदतीचा हात पुढे केला आहे.