नदीकाठच्या गावांना साथींचा धोका
By admin | Published: November 17, 2014 12:02 AM2014-11-17T00:02:06+5:302014-11-17T00:23:08+5:30
ंमैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगेत; अवकाळी पाऊस व एसटीपी प्लँट बंद असल्याचा परिणाम
कोल्हापूर : गत आठवड्यातील अवकाळी पाऊस व बंद असलेले कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र यामुळे गेली काही दिवस शहरातील मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत एकट्या जयंती नाल्यातून किमान २०० एमएलडीपेक्षा अधिक मैलामिश्रित पाणी पंचगंगेत मिसळले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना अतिसार, गॅस्ट्रो व कावीळ आदी रोगांचा धोका वाढला आहे. नदीचे पाणी पिणाऱ्यांनी ते उकळून प्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
शहरात या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण शहरातील नाल्यांतून सांडपाणी नदीत मिसळले. यातच सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास महापालिकेला अपयश आले आहे. दररोज किमान ५० ते ६० दशलक्ष लिटर मैलामिश्रित पाणी जयंती नाल्यातून पंचगंगेत मिसळत आहे. केंद्र कधी सुरू होणार, हे नेमके महापालिकेलाही ठाऊक नाही. परिणामी, नदीच्या प्रदूषणाची मात्रा पुन्हा वाढली आहे.
या दूषित पाण्यामुळे इचलकरंजीसह नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीस नदीकाठच्या गावांत साथींच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. मैलामिश्रित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी नदी प्रवाहित ठेवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
मात्र, सध्या शेतीच्या कामासाठी पाण्याची गरज ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे. पिकांची कापणी सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी कमी असल्याने पंचगंगेत राधानगरी धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्याचे जून २०१५ पर्यंतचे नियोजन ठरले आहे. त्यातच सध्या नदीच्या पाण्याचा उपसा कमी असल्याने संथ वाहणाऱ्या पंचगंगेमुळे नदीकाठच्या गावांना पाण्यातून होणाऱ्या रोगांचे प्रमाण बळावणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात झालेला अवकाळी पाऊस व बंद असलेले सांडपाणी प्रक्रिया कें द्र यामुळे रविवारीही मोठ्या प्रमाणात जयंती नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत होते.
दक्षता घ्या
मैलामिश्रित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी पाण्यात क्लोरिनचे प्रमाण वाढविले जात आहे. क्लोरिनच्या अतिरिक्त मात्रेमुळे थायरॉईडसारख्या आजारांना निमंत्रण दिले जाते. पंचगंगेत मैलामिश्रित पाणी मिसळत असल्याने या पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार, थकवा, आदी आजार बळावण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीचे पाणी पिण्यास वापरण्यापूर्वी उकळून प्यावे, योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले.
एसटीपी प्लँटचा मार्ग खडतर
महापालिकेच्या हद्दीतील किमान ९५ एमएलडी दूषित सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते तसेच इचलकरंजी शहरातील २६ एमएलडी पाणी प्रक्रियेविनाच नदीत जाते. सांडपाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेला एप्रिल २०१३ची एमपीसीबीने ‘डेडलाईन’ दिली होती. आता न्यायालयाने नव्याने ३१ जानेवारी २०१४ची नवीन मुदत दिली आहे. शेतीच्या कामामुळे एसटीपी केंद्र सुरू होण्यास मोठा अवधी लागण्याची शक्यता आहे.