PM Kisan चे आणखी ४३०० खातेदार अपात्र, दुसऱ्या हप्त्याला विलंब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:59 AM2022-05-10T10:59:21+5:302022-05-10T11:00:16+5:30
PM Kisan Scheme : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘पी. एम. किसान’ योजना सुरू केली. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना अनेक त्रुटी होत्या. वास्तविक खातेदार शेतकऱ्यांनाच पेन्शन योजनेचा लाभ देणे अपेक्षित होते.
- राजाराम लोंढे
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘पी. एम. किसान’ योजनेतील लाभार्थ्यांची कसून चौकशी महसूल यंत्रणेकडून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १६ हजार खातेदार अपात्र ठरले होते. या चौकशीत आणखी ४ हजार ३०० खातेदार अपात्र ठरले आहेत. संपूर्ण खात्यांची चौकशी करून १० जूनपर्यंत केंद्र सरकारकडे अहवाल पाठवायचा असल्याने यंत्रणा गतिमान झाली आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘पी. एम. किसान’ योजना सुरू केली. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना अनेक त्रुटी होत्या. वास्तविक खातेदार शेतकऱ्यांनाच पेन्शन योजनेचा लाभ देणे अपेक्षित होते. त्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेवर सोपविणे गरजेचे होते. मात्र, महा ई-सेवा केंद्रांसह इतरांनी शेतकऱ्यांची माहिती भरल्याने मोठ्या प्रमाणात बोगस शेतकरी यादीत आले. याबाबत तक्रारी झाल्यानंतर केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार गेले वर्षभर त्याची चौकशी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार खातेदार अपात्र ठरले. यामध्ये आयकर परतावा करणारे, सरकारी नोकरी असणाऱ्यांचा अधिक प्रमाणात समावेश होता. त्यांच्याकडून वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.
अपात्र खातेदारांची सखोल चौकशी सुरू असून, आणखी चार हजार ३०० खातेदार अपात्र ठरले आहेत. आठ हजार खातेदारांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांना आधार लिंक करण्याची सक्ती केली आहे. येत्या महिनाभरात चौकशी पूर्ण करून अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. अपात्र खातेदारांना नोटीस काढून लाभाची रक्कम परत करण्यासाठी विहित कालावधी द्यावा, त्या कालावधीत पैसे परत केले नाही, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना आहे.
आणेवारी असणारे अपात्र ठरणार
ज्यांच्या नावावर जमीन आहे, तेच पात्र ठरणार असून, आणेवारीत असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सध्या लाभ घेत असलेल्यांमध्ये आणेवारीतील शेतकऱ्यांची संख्या कमी नाही.
चौकशीसाठी चाळण...
पी. एम. किसान योजनेतील बोगसगिरीची थेट संसदेत चर्चा झाली होती. त्यामुळे लाभार्थ्यांच्या चौकशीसाठी महसूल यंत्रणेने अक्षरश: चाळण लावली आहे. लाभ घेतलेल्या बोगस खातेदारांकडून रक्कम तातडीने वसुली करा, असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. जे अधिकारी वसूल करणार नाहीत, त्यांच्यावर थेट कारवाई करण्याची तयारी केंद्र सरकारने केल्याने संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
दुसऱ्या हप्त्याला विलंब
साधारणत: मे महिन्याच्या १ किंवा २ तारखेला पी. एम. किसानचा दुसरा हप्ता येतो. चौकशी सुरू आहे, त्यात एकाही अपात्र खातेदाराच्या नावावर पैसे जमा होणार नाहीत, याची दक्षता महसूल यंत्रणेने घेतली आहे. त्यामुळे हप्ता वर्ग होण्यास आणखी दहा दिवसांचा विलंब लागणार असल्याचे समजते.