Kolhapur: पी.एन. पाटील यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव अजूनही कमी नाही, कार्यकर्त्यांकडून देवाला साकडे
By विश्वास पाटील | Published: May 21, 2024 01:16 PM2024-05-21T13:16:35+5:302024-05-21T13:16:59+5:30
कोल्हापूर : काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी.एन.पाटील यांची प्रकृती अजूनही गंभीरच असल्याचे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट ...
कोल्हापूर : काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी.एन.पाटील यांची प्रकृती अजूनही गंभीरच असल्याचे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट झाले. त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव थांबायला हवा होता परंतू तो अजून थांबत नसल्याने ही चिंतेची बाब असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ते यातून बरे व्हावेत यासाठी कार्यकर्ते देवाला साकडे घालत आहेत.
मंगळवारी सकाळी मुंबईतील प्रख्यात मेंदूशल्य चिकित्सक डॉ.सुहास बराले, राहूल पाटील यांनी ॲस्टर आधार रुग्णालयात आमदार पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकांशी चर्चा केली. रविवारी सकाळी आमदार पाटील चक्कर येवून बाथरुममध्ये पडल्याने त्याचवेळी त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. त्यांच्यावर रविवारी सायंकाळीच तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी ७२ तासांचा अवधी काळजी करण्यासारखा असल्याचे सांगितले होते. कालच्या प्रमाणे आजही त्यांची प्रकृती स्थिर आहे. रक्तस्त्राव थांबला असता तर ते उपचाराला चांगला प्रतिसाद देतात असे म्हणता आले असते. परंतू दुर्देवाने तसे झालेले नाही. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या उपचारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रिघ..
रुग्णालयात येवून आमदार पाटील यांच्या प्रकृतीबध्दल जाणून घेण्यासाठी व त्याचवेळेला राहूल पाटील यांना धीर देण्यासाठी गेली तीन दिवस जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे. सकाळी व्ही. बी. पाटील, भारत पाटील भुयेकर, डॉ. संदिप पाटील, उदयसिंह पाटील, भोगावतीचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांच्यासह अनेकांनी येवून प्रकृतीची विचारपूस केली.
कार्यकर्त्यांच्या जीवाला घोर..
रात्री नको म्हणतानाही पाचपंचवीस कार्यकर्ते दवाखान्याच्या आवारात झोपायला थांबत आहेत. साहेबांच्या काळजीने घरी जावून झोप लागत नाही म्हणून आम्ही इथेच थांबतो असे ते सांगतात त्यामुळे सगळ्यांचाच नाईलाज होत आहे.
दर्डा यांच्याकडून धीर..
लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी राहूल पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधून आमदार पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली व राहूल यांना आधार दिला. दर्डा व आमदार पाटील यांचे खूप चांगले ऋणानुबंध आहेत. त्या दोघांनी एकाचवेळी विधानसभेत काम केल्याने त्यांच्यात मित्रत्वाचे नाते आहे.
शाहू छत्रपती रोज रुग्णालयात..
शाहू छत्रपती यांनीही सकाळी राहूल पाटील यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. त्यांचीही रोज रुग्णालयात न चुकता फेरी सुरु आहे. त्यांना आपण रुग्णालयात येवू नका, प्रकृतीचे अपडेट कळवतो म्हणून सांगितले तरी त्यांना वाड्यावर चैन पडत नसल्याने ते थोडावेळ का असेना रुग्णालयात येवून जात आहेत.