कवितेला समीक्षकांची नव्हे वाचकांची गरज : राजन गवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 04:32 PM2019-10-01T16:32:44+5:302019-10-01T16:51:17+5:30
आजच्या घडीला कवितेला समीक्षकांची नव्हे, तर चांगल्या रसिक वाचकांची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. कविता ही कविता असते, तिचे वर्गीकरण होऊ शकत नाही; पण मास्तरांकडून त्याची फोड करून शिकवली जात असल्याने त्यातील सौंदर्य नष्ट होत असल्याने अशा मास्तरांचाच बंदोबस्त करायला हवा, असेही गवस यांनी सांगितले.
कोल्हापूर : आजच्या घडीला कवितेला समीक्षकांची नव्हे, तर चांगल्या रसिक वाचकांची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. कविता ही कविता असते, तिचे वर्गीकरण होऊ शकत नाही; पण मास्तरांकडून त्याची फोड करून शिकवली जात असल्याने त्यातील सौंदर्य नष्ट होत असल्याने अशा मास्तरांचाच बंदोबस्त करायला हवा, असेही गवस यांनी सांगितले.
कवी दीपक बोरगावेलिखित आणि सम्यक विद्रोही प्रबोधन संस्था प्रकाशित ‘भवताल आणि भयताल’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन सोमवारी शाहू स्मारक भवनमध्ये झाले. यावेळी गवस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कवी बोरगावे यांच्यासह मेघा पानसरे, धनाजी गुरव, सीमा मुसळे, विश्वास सायनाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बोरगावे यांनी कवी म्हणवून घेणे कमीपणाचे वाटत असल्याचे मनोगतात सांगितले, याचा धागा पकडून गवस यांनी कवी म्हणवून असे म्हणणे म्हणजे कविता समजलीच नाही, अशी रोखठोक भूमिका मांडली. भोवतालची सळसळ फक्त कवी शब्दबद्ध करू शकतो. नुसत्या वाचनाने कविता समजत नाही, तिच्याशी तुम्ही किती झोंबता, भांडता, भीडता यावर ती किती समजली हे कळत असते, असेही गवस यांनी सांगितले.
कवी बोरगावे यांनी आयुष्यातील वैयक्तिक आघाताने कवितेकडे वळल्याचे सांगितले. याचवेळी उजव्या शक्ती सत्तेच्या केंद्रस्थानी आल्याने कवितालेखन अधिक ताकदीने झाल्याचे सांगितले. मेघा पानसरे यांनी टोकाच्या अस्थिर कालखंडात माणूस म्हणून व्यक्त होणे ही अवघड होत असताना हा कवितासंग्रह व्यक्त होण्यासाठी मार्गदर्शन ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
सीमा मुसळे यांनी कवितासंग्रहाचा समग्र आढावा घेताना समाजाचे बदलते मानस यातून प्रतिबिंबीत होत असल्याचे सांगितले. धनाजी गुरव यांनी सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षा भयंकर असून, आजूबाजूचा भयताल भयताड झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. प्रशांत नागावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.