गडहिंग्लजला सांडपाण्याचे कवित्व
By admin | Published: April 16, 2015 10:28 PM2015-04-16T22:28:40+5:302015-04-17T00:15:03+5:30
जबाबदार कोण : कायमस्वरूपी उपाययोजनेचे काय ?
राम मगदूम - गडहिंग्लज सांडपाणी बंधाऱ्यातील सांडपाणी उपसण्याच्या ठेक्याच्या मक्तेदाराने त्या कामाच्या ठेक्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे गडहिंग्लज शहरातील सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांची तक्रार झाली की, सांडपाण्याची वेळोवेळी चर्चा होते. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनेचे काय? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
गडहिंग्लज शहराची लोकवस्ती ३० हजारांच्या आसपास आहे. दररोज शहराला सुमारे ६० लाख लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यापैकी ४० लाख लिटर पाणी वाया जाते. वाया जाणाऱ्या पाण्यामुळेच सांडपाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या काही भागांतून एकत्र करण्यात आलेले सांडपाणी नदीवेशीकडे हिरण्यकेशी नदीच्या दिशेने वाहून जाते.
सांडपाणी थेट नदीत मिसळू नये, यासाठी नदीघाटानजीक नगरपालिकेने बंधारा बांधला आहे. बंधाऱ्याची साठवण क्षमता सुमारे १५ लाख लिटर असून, साठणाऱ्या सांडपाण्याचा दररोज उपसा करावा लागतो. त्यासाठी सांडपाणी उपसण्याचे काम ठेका पद्धतीने दिले जाते. उपसलेले सांडपाणी आजूबाजूच्या शेतीला वापरले जाते.
२०१३ मध्ये सांडपाणी उपसण्याच्या कामाची फेरनिविदा काढण्यात आली. त्यावेळी लक्ष्मण बाबूराव शिंदे यांनी हा ठेका घेतला. मात्र, आठवड्यापूर्वीच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘या’ ठेक्यावर मोठा वादंग झाला. ठेकेदार शिंदे हे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेविका दीपा बरगे यांचे बंधू असल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे. सांडपाण्याची फेरनिविदा काढण्यात आली, त्यावेळी सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने कोणतीही कल्पना न देता चार-पाच कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या होत्या. आठवड्यापूर्वी ठेक्याच्या करारपत्रावर आपल्या सह्या करून घेण्यात आल्या आहेत; मात्र त्या ठेक्याशी आपला किंवा आपल्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा खुद्द शिंदेंनी केला आहे. त्यामुळे हा ठेका नेमका कुणाकडे आहे? त्यासाठी कुणाला जबाबदार धरायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रदूषण मंडळाची
पालिकेला नोटीस
‘मे’मध्ये होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांडपाण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सांडपाणी नदीत मिसळल्यास गडहिंग्लजच्या पूर्वभागातील २० ते २५ खेड्यांतील लोकांच्या आरोग्यालाही धोका पोहोचणार आहे. त्यामुळे नियंत्रण मंडळाने पालिकेला नोटीस बजावून याप्रश्नी तातडीने उपाय योजण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सांडपाण्यावर
प्रक्रियेची गरज
सांडपाण्याला बांध घालून ते पाणी शेतीला देण्याची जुनी पद्धत कालबाह्य ठरली आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरपालिकेने अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र व राज्याकडून खास निधीदेखील मिळतो. मात्र, त्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.
‘बोली’ची चढाओढ ‘बंद’!
चित्री प्रकल्प होण्यापूर्वी सांडपाणी उपसण्याच्या ठेक्याला मागणी होती. चढाओढीच्या बोलीत लाखो रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळत होते. मात्र, ‘चित्री’ प्रकल्प झाल्यानंतर गडहिंग्लज व परिसरातील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे शेतीसाठी सांडपाण्याचा वापर कमी झाल्यामुळे या ठेक्याच्या बोलीतील चढाओढ बंद झाली आहे.