प्रसाद वाटपातून विषबाधा, शंभरहून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 01:40 PM2024-01-03T13:40:31+5:302024-01-03T13:41:18+5:30
राजेंद्र पाटील भोगावती : परिते ता. करवीर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदीरामध्ये सुरु असलेल्या हरिनाम सप्ताह निमित्ताने केलेल्या प्रसाद वाटपामधून विषबाधा ...
राजेंद्र पाटील
भोगावती : परिते ता. करवीर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदीरामध्ये सुरु असलेल्या हरिनाम सप्ताह निमित्ताने केलेल्या प्रसाद वाटपामधून विषबाधा झाल्याची घटना घडली. यातील तब्बल शंभरहून अधिक रुग्णांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
परिते येथे सोमवारपासून हरिनाम सप्ताह सुरु आहे. यामध्ये ज्ञानेश्वरीचे वाचन करण्यासाठी पन्नासहून अधिक वारकरी तसेच गावातील युवक मंडळी वाचनासाठी मंदिरामध्ये बसतात. या वाचकांसाठी आठ दिवसांमध्ये गावातील इच्छुक तसेच दानशूर व्यक्तींच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
सोमवारी सकाळी गावातील शंभरहून अधिक मंडळींनी भात भाजी आमटी तसेच बासुंदी असा महाप्रसाद घेतला. महाप्रसाद घेतल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर यासर्वांना उलटी, जुलाबचा त्रास सुरु झाला. हळुहळू रुग्णांची संख्या वाढत गेली. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच तात्काळ ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य विभागाला कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तात्काळ परिते गावातील घराघरात आणि प्राथमिक शाळेत माहिती घेतली. यामध्ये आत्तापर्यंत शंभर पेक्षा अधिक जणांना प्रसादातून विषबाधा झाल्याचे आढळून आले. रुग्णांवर राशिवडे, ठिकपुर्ली, इस्पुर्ली, सी.पी.आरमध्ये उपचार सुरु आहेत.
दूधजन्य पदार्थातूनच विषबाधा झाल्याची शक्यता आहे. प्राथमिक उपचार म्हणून गावामध्ये एक युनिट उभा केला असून गंभीर रुग्णास सरकारी दवाखान्यात उपचारासाठी हलवले जात आहे. एकूणच सर्वच रुग्णांची प्रकृती बरी असल्याचे यावेळी सरपंच मनोज पाटील यांनी सांगितले.