जोंकमारी वनस्पतीमुळे जनावरांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:00 PM2020-02-06T12:00:18+5:302020-02-06T12:01:59+5:30
पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिकेत आढळणारी जोंकमारी ही विषारी वनस्पती महाराष्ट्रातही आढळली आहे. चाऱ्यातून ही वनस्पती पोटात गेल्यास जनावरे दगावतात. औरंगाबादमध्ये गेल्या महिन्यात ही वनस्पती खाल्ल्याने अशाच प्रकारच्या विषबाधेचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक जागरुक राहावे, असे आवाहन वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले आहे.
कोल्हापूर : पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिकेत आढळणारी जोंकमारी ही विषारी वनस्पती महाराष्ट्रातही आढळली आहे. चाऱ्यातून ही वनस्पती पोटात गेल्यास जनावरे दगावतात. औरंगाबादमध्ये गेल्या महिन्यात ही वनस्पती खाल्ल्याने अशाच प्रकारच्या विषबाधेचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक जागरुक राहावे, असे आवाहन वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले आहे.
राज्यातील अहमदनगर, अकोला, चंद्रपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, रायगड, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये या वनस्पती आढळतात. ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती आहे. फांद्या चौकोनी व गुळगुळीत असतात. फुले निळ्या रंगाची असून, पानांच्या बेचक्यातून लांब देठावर ती एकांडी येतात. याच्या बियादेखील कोंबड्या व पक्ष्यांसाठी विषारीच आहेत.
असेही फायदे
ही वनस्पती विषारी असल्याचे जसे तोटे आहेत, तसे काही फायदेही आहेत. यात कीटकनाशक गुणधर्म असल्याने मासे व जळवा मारण्यासाठी याचा उपयोग होतो. पिसाळलेल्या कुत्र्याच्या व कोल्ह्याच्या विषारात याच्या पानाचा रस ठरावीक प्रमाणात देतात अथवा दंशावर लेप करतात. अंगात रुतलेले काटे काढण्यास व व्रण भरून येण्यासदेखील या वनस्पतीचा लेप गुणकारी ठरतो.
जनावरांमधील विषबाधेची लक्षणे
पोट गच्च होते, पोटाची हालचाल व प्रक्रिया मंदावते, चारा खाणे व रवंथ करणे या प्रक्रिया बंद होतात. संडास व लघवी होण्याची प्रक्रियाही मंदावते. जांघेत व मानेच्या खाली सूज येऊन पाणी जमा होते. अशक्तपणा वाढून अंग गार पडून थरथर कापू लागते, ही लक्षणे आढळल्यास ७ ते ८ दिवसांत जनावर दगावते.
उपचार
एक किलो चुना दहा लिटर पाण्यात मिसळून चांगले ढवळून दहा तास स्थिर ठेवलेली ही चुन्याची निवळी दिवसातून तीन वेळेस एक ते दीड लिटर या प्रमाणात पाजावी. गुळाची काकवी २५0 ग्रॅम, रेचक (पॅरोलेक्स बोव्हीरीम)च्या गोळ्या द्याव्यात. तोंडातून व शिरेतून कॅल्शियमसह ‘ब’ जीवनसत्त्वाचे इंजेक्शनही दिले जाते.