कचरा उठावासाठी विष प्राशनाचा इशारा

By Admin | Published: February 5, 2016 11:12 PM2016-02-05T23:12:40+5:302016-02-06T00:03:14+5:30

उदगाव ग्रामसभा : वाहतुकीस अडथळा करणारी अतिक्रमणे काढणार

Poisonous warning for rubbish | कचरा उठावासाठी विष प्राशनाचा इशारा

कचरा उठावासाठी विष प्राशनाचा इशारा

googlenewsNext

जयसिंगपूर : ग्रामपंचायत जागेत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचत आहेत, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ग्रामपंचायतीला वारंवार कळवूनही याबाबत कानाडोळा करीत आहे. त्वरित कचरा उठाव करा, अन्यथा सहकुटुंब विष प्राशन करण्याचा इशारा येथील एका महिलेने ग्रामसभेत दिल्याने एकच खळबळ उडाली. उदगाव (ता. शिरोळ) येथे २६ जानेवारीची तहकूब ग्रामसभा आज, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती पाटील होत्या. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यावेळी १४ व्या वित्त आयोगातील ३२ लाख रुपये ग्रामपंचायतीकडे असल्याने याच्या आराखड्याची माहिती देऊन मंजुरी घेण्यात आली. दरम्यान, सोनबा पाटील यांनी बिअरबारसाठी ग्रामपंचायतीत मंजुरी पत्र दाखल केले होते. मात्र, याला विरोधी गटातील महिला सदस्यांनी विरोध केला, तर सत्तारूढ सदस्य शिवाजी कोळी यांनी यास परवानगी द्या, अन्यथा गावातील सर्वच परवाने रद्द करा, अशी मागणी केली.
स्वच्छतेवरून धोंडूबाई कदम यांनी ग्रामपंचायत सदस्यासह प्रशासनाला धारेवर धरून प्रश्नांचा भडिमार केला. प्रत्येक वेळी
पाहणी करून जाता, स्वच्छता करण्याबाबत अंमलबजावणी
होत नाही, असा सवाल उपस्थित करून स्वच्छता करा अन्यथा सहकुटुंब विष प्राशन करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. यावर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तुमचा प्रश्न ताबडतोब निकालात काढण्याची ग्वाही दिली.
यावेळी पाणीपुरवठा, स्वच्छता समिती, सामाजिक लेखापरीक्षण समिती गठीत करण्यात आली, तर बसस्थानकावरील अतिक्रमण व अनधिकृत डिजिटल फलके काढण्याचा दुसऱ्यांदा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याचा ठराव करण्यात आला. यासह विषयपत्रिकेवरील ३२ विषयांपैकी २६ विषयांना ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली.
याप्रसंगी उपसरपंच प्रकाश बंडगर, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष कोरे, प्रज्ञा मगदूम, सविता ठोमके, शिवाजी कोळी, राजाराम वरेकर, अभिनंदन पाटील, राजेंद्र मगदूम, भरत पाटील, शांताराम पाटील, दिलीप माने, शरद लुगडे, अमोल माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Poisonous warning for rubbish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.