Sambhajiraje Chhatrapati: शानदार समारंभात संभाजीराजेंना पोलंडचा ‘द बेने मेरिटो’ पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:22 AM2022-04-27T11:22:26+5:302022-04-27T11:22:56+5:30
पोलंडच्या नागरिकांना किंवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या ५००० निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आसरा दिला होता.
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांना मंगळवारी दिल्ली येथे झालेल्या शानदार समारंभात पोलंडचे परराष्ट्रमंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते ‘द बेने मेरिटो’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील पोलंड दूतावासात हा समारंभ झाला. पोलंडच्या नागरिकांना किंवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना हा पुरस्कार देण्यात येतो.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या ५००० निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आसरा दिला होता. या नागरिकांसाठी वळीवडे येथे मोठा कॅम्प उभारण्यात आला होता. २०१९ साली या घटनेस ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन या कॅम्पमध्ये राहिलेल्यांपैकी हयात असणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य अतिथी म्हणून निमंत्रित करून वळीवडे पोलंड कॅम्पच्या स्मृती जगविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
१४ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या या कार्यक्रमात पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत ॲडम बुराकोव्स्की यांच्या हस्ते १९४२ ते १९४९ या काळात येथे वास्तव्य करणाऱ्या या पोलिश कुटुंबांच्या आणि नागरिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतिस्तंभाचे अनावरण आणि संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली होती.
भारत व पोलंड या दोन्ही राष्ट्रांमधील हा ऐतिहासिक बंध पुन्हा जोपासण्यासाठी संभाजीराजे यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.