राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीचे ध्रुवीकरण
By admin | Published: September 11, 2014 09:12 PM2014-09-11T21:12:15+5:302014-09-11T23:18:29+5:30
इचलकरंजीतील राजकारण : सत्वशील मानेंची भूमिका, फलकाचा वाद
इचलकरंजी : नगरपालिकेतील राजकारण, सत्वशील माने यांची भूमिका आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मंचावरील फलक अशा तिन्ही वेगवेगळ्या घटनांमुळे येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील गटबाजीची दरी रुंदावली आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शहरातील राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. प्रत्येक गटाने वस्त्रोद्योग व शेतीमाल प्रक्रिया यासाठी आपापल्या सहकारी संस्था स्थापन केल्या आणि स्वत:चे स्वतंत्र ‘राज्य’ निर्माण केले आहे. या सर्व संस्था स्थापन करून त्यांच्या मंजुरीसाठी तत्कालीन खासदार निवेदिता माने यांचे योगदान सर्वांनाच मिळाले
आहे. शहर आणि परिसराच्या राजकीय क्षेत्रात या सर्व गटांचे स्वतंत्र अस्तित्व असले, तरी माजी खासदार माने यांच्या निवडणुकीसाठी सर्व गट एकत्रित येऊन कामाला लागत असत. याउलट विधानसभा निवडणुकीवेळी ‘आवाडे’ यांच्या विरोधात उभे ठाकत असत.
अशा पार्श्वभूमीवर सध्या नगरपालिकेत राष्ट्रीय व राष्ट्रवादी अशी दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेत आहे. त्यातील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद रवींद्र माने असून, पालिकेतील राजकारण माजी आमदार अशोकराव जांभळे हाताळत आहेत. पालिकेतील जांभळे व माने यांच्या राजकीय हालचाली आणि त्यांची राष्ट्रीय कॉँग्रेसबरोबर असलेली ‘सलगी’ यामुळे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मदन कारंडे व त्यांचा गट त्यांच्यापासून दुरावला आहे.
राष्ट्रवादीने विसर्जन मिरवणूक मार्गावर नेहमीप्रमाणे नारायण टॉकीजसमोर स्वागत मंच उभारला होता. मंचावरील फलकावरून श्रीमती निवेदिता माने, अशोकराव जांभळे व रवींद्र माने यांची छायाचित्रे गायब झाली. गेल्या १५ वर्षांत प्रथमच माने व जांभळे यांची छायाचित्रे वापरली नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. याचा संदर्भ घेऊन माने, जांभळे व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी मदन कारंडे यांचे शहर अध्यक्षपद रद्द करण्याची मागणी थेट प्रदेश कार्यकारिणीकडे केली.
याबाबत बोलताना कारंडे यांनी, निवेदिता माने यांचे पुत्र सत्वशील माने भाजपकडे चालले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी विरुद्ध उघडपणे मोहीम उघडली असल्याचे सांगण्यात आले. सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. त्यामुळे इचलकरंजी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील गटबाजीमधील कुरघोड्यांच्या खेळींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)