रस्त्यावर फिरणारे हौसे, नवसे, गवसेंवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:24 AM2021-05-14T04:24:03+5:302021-05-14T04:24:03+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहेत. घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई ...
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहेत. घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. तरीही अनेक सुजाण नागरिक खुल्या हवेचा आनंद लुटण्यासाठी फिरायला बाहेर पडत आहेत. अशा ६६ पुरुष व महिलांवर जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्यावर महापालिकेने दंडात्मक कारवाई करुन सुमारे ३३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. कोविड नियमावलीनुसार जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधित आदेश दिले आहेत. या कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना वारंवार सूचना देऊन त्यांना अटकाव केला जात आहे. तरीही काही हौसे, नवसे, गवसे शहरातील उद्यान, चौपाटी, मैदान अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोकळ्या हवेचा आनंद घेण्यासाठी अगदी पहाटेपासून येतात. जुना राजवाडा पोलिसांनी अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळी पोलीस पथकाने मॉर्निंग व ईव्हीनिंग वॉक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. यावेळी ६६ जणांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. या नागरिकांना प्रतिबंधित आदेशाबाबत व कोरोना विषाणूचा वाढलेला संसर्ग याची माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करत ३३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.