जयसिंगपूर, शिरोळमध्ये पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:45+5:302021-06-03T04:17:45+5:30
जयसिंगपूर /शिरोळ : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाकडून आणखी कडक निर्बंधाची कार्यवाही बुधवारी सुरू करण्यात आली. पोलीस प्रशासनाने कारवाईचा ...
जयसिंगपूर /शिरोळ : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाकडून आणखी कडक निर्बंधाची कार्यवाही बुधवारी सुरू करण्यात आली. पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविली. आस्थापना, दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अंकली टोलनाका येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड पोलिसांनी पुन्हा टाईट बंदोबस्त सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळाले.
शिरोळ तालुका हॉटस्पॉट बनल्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी निर्बंधाचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस प्रशासनाने नगरपालिका, ग्रामपंचायतीमार्फत मोहीम राबविली. शिरोळ येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. औरवाड फाटा, अर्जुनवाड पूल याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागावर विशेष करून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तर शिरोळ पोलिसांनी बायपास मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवरदेखील कारवाई केली. जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी दानोळी येथे विनामास्क फिरणाऱ्या ३१ जणांवर कारवाई केली. जयसिंगपूर येथे बिअरबारवर छापा टाकून पंधरा हजार रुपयाचा दंड केला. पाच ग्राहकांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर सहा दुकानांवर कारवाई करून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल केला.