रोडरोमिओंवर पोलिसांची कारवाई
By admin | Published: August 29, 2014 12:01 AM2014-08-29T00:01:24+5:302014-08-29T00:07:40+5:30
पालकांतून समाधान व्यक्त : १० ते १५ युवकांची धरपकड
कोपार्डे : येथील सांगरूळ फाटा ते कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या रस्त्यावर रोडरोमिओंवर आज, गुरुवारी पोलिसांनी अचानक कारवाई करीत पोलिसी खाक्या दाखविला. पोलिसांच्या कारवाईदरम्यान रोडरोमिओंची केविलवाणी अवस्था पाहून लोकांकडून पोलिसांबद्दल आभाराची भावना व्यक्त होत होती.
आज, गुरुवारी करवीर पोलिसांत एका महाविद्यालयीन मुलीने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर करवीर पोलिसांत या मार्गावर मुलींना त्रास देत असलेल्या रोडरोमिओंबद्दल तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत करवीरचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी या मार्गावर आपले पोलीस पथक पाठविले होते. या पोलीस पथकाने कॉलेज व महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत या ठिकाणी अचानक छापा टाकून, रोडरोमिओंना हेरत एक-एक रोडरोमिओला पकडत कारवाई सुरू केल्याने एकच धावपळ सुरूझाली. त्यामुळे कॉलेजला आलेल्या मुलांमध्येही काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
मात्र, पोलिसांनी नेमक्या रोडरोमिओंना पकडून १० ते १५ जणांना पोलीस गाडीत टाकले. यावेळी पोलिसी खाक्यापासून वाचण्यासाठी रोडरोमिओंची झालेली धडपड फार केविलवाणी होती. ‘साहेब, मी त्यातला नाही. मी बाजारासाठी आलो होतो. मी कोल्हापूरला निघालोय. साहेब, मला सोडा नाहीतर मला घरात घेणार नाहीत...’ अशा विनवण्या ऐकायला मिळत होत्या. मात्र, यामुळे पालक व महाविद्यालयीन मुलींमध्ये समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
करवीरच्या पश्चिम भागात कुंभी-कासारी येथे एक महाविद्यालय, दोन ज्युनिअर कॉलेज, चार प्राथमिक व माध्यमिक शाळा, विविध संगणक कोर्स, व्यवसाय शिक्षण, आदी संस्थांत करवीर, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यांतील किमान एक हजार मुली शिक्षणासाठी येतात. येथील शैक्षणिक वातावरण ग्रामीण असल्याने कोल्हापूर शहरात शिक्षणासाठी मुलींना पाठविण्यापेक्षा कुंभी-कासारी येथे पाठविणे पालक सुरक्षित मानतात. मात्र, काही रोडरोमिओंमुळे शैक्षणिक वातावरण गढूळ झाले होते.
यासाठी शिक्षण संस्थाही अशा रोडरोमिओंवर कारवाई करण्यापेक्षा हात वर करण्यातच धन्यता मानत होत्या. मात्र, एका मुलीच्या तक्रारीवर आज करवीर पोलिसांच्या पथकाने कारवाई केल्याने आता अशा रोडरोमिओंवर अंकुश येऊ शकतो. याबाबत पकडलेल्या रोडरोमिओंच्या नावांबाबत विचारणा केली असता प्रथम यांना समजावणार आहे, असे सांगत नावे देण्यास नकार दिला. (वार्ताहर)