पोलीस प्रशासनाने कौशल्याने हाताळली गंभीर पूरस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:01+5:302021-07-27T04:26:01+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली असतानाही नागरिकांच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाने समन्वयाने व योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली, त्यामुळे जिल्ह्यात ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली असतानाही नागरिकांच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाने समन्वयाने व योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली, त्यामुळे जिल्ह्यात कुठेही जीवितहानी झाली नाही अगर नुकसानही जादा प्रमाणात झाले नसल्याचा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला.
गेले चार दिवस मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता. करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील बहुतांशी गावे महापुरात पाण्याखाली आली होती. सोमवारी बहुतांश भागातील पाणी ओसरले, राष्ट्रीय महामार्गही सुरु झाल्याने जिल्ह्याची दळणवळण यंत्रणा पूर्ववत सुरु झाली. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बलकवडे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, २०१९मध्ये आलेल्या महापुरात पाणीपातळी ५५.०६ इतकी होती, त्या महापुराचा सूक्ष्मपणे अभ्यास करुन यंदाच्या पुरातील रेस्क्यूबाबत नियोजन केले होते. महापूर येण्यापूर्वीच महिनाभर तीन बैठका झाल्या. ग्रामीण व शहरी भागातील पूररेषा गृहित धरुन रेस्क्यूबाबत नियोजन केले. ग्रामीण भागात तहसीलदार व प्रांताधिकारी तसेच शहरी भागात महापालिका अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गेल्या चार दिवसात महापुराची पाणीपातळी ५६.०२ पर्यंत पोहोचली होती. महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या, चार दिवसाच्या पुरात पोलीस यंत्रणेने कामापलीकडे जाऊन जबाबदारी पार पाडली. पुराच्या परिस्थितीला प्रारंभ होताच, ‘एनडीआरएफ’ची पथके येण्यापूर्वीच पोलिसांनी शिरोळ तालुक्यात वाहनांतून रेस्क्यू करुन नागरिक व साहित्याचे स्थलांतर करण्यास मदत केली. जिल्ह्यातील धरणे भरली नसतानाही मुसळधार पावसामुळे महापुराची गंभीर स्थिती बनली, त्यामुळे महापुराची तीव्रता वाढली होती.
राष्ट्रीय महामार्गावर होती पाच हजार वाहने थांबून
महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. त्यामुळे महामार्गावर सुमारे पाच हजारांवर वाहने तीन दिवस थांबून होती. त्यासाठी महामार्गावरील पोलीस स्थानकांचे प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी समन्वयाने भूमिका बजावली. ट्रकमधील मालाची लूट होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तही होता. वाहनचालकांना नागरिकांनी जेवण, नाष्ट्याचीही सोय केली होती. अखेर सोमवारी महामार्ग सुरु झाल्याने वाहनचालकांनी नि:श्वास सोडला.
तीन पोलीस स्थानके पाण्यात
जिल्ह्यातील कुरुंदवाड, कळे व कोल्हापूर शहर वाहतूक शाखा ही तीन पोलीस स्थानके महापुरात पाण्यात बुडाली होती.
गणेशमूर्ती गोदामात विसावल्या
महापुरात दरवर्षी गणेश मूर्तिकारांना फटका बसतो. शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प हे भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. तेथील तयार झालेल्या गणेशमूर्ती ठेवण्यासाठी मार्केट यार्डमधील गुळाची गोदामे, शाहू सांस्कृतिक भवन उपलब्ध झाले होते. त्यामुळे महापुराचे सावट दिसताच सुमारे १५ ट्रक व डंपरच्या सहाय्याने तयार गणेशमूर्ती स्थलांतरित करता आल्या.