गारगोटी येथे सहा सडकसख्याहरींना पोलिसांनी केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:23 AM2020-12-08T04:23:05+5:302020-12-08T04:23:05+5:30
येथील बसस्थानक परिसरात धिंगाणा घालणाऱ्या सहा सडकसख्याहरींवर भुदरगड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत दंडात्मक कारवाई केली आहे. कोरोना महामारीमुळे ...
येथील बसस्थानक परिसरात धिंगाणा घालणाऱ्या सहा सडकसख्याहरींवर भुदरगड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत दंडात्मक कारवाई केली आहे.
कोरोना महामारीमुळे बंद असणारी शाळा, महाविद्यालये सुरू होत आहेत. खेडोपाड्यातील विद्यार्थिनी बसने प्रवास करीत असल्यामुळे गावी जाण्यासाठी गारगोटी बसस्थानकात बसच्या प्रतिक्षेत असतात. यावेळी या ठिकाणी सडकसख्याहरी फिरत असतात. दुचाकीचे कर्णकर्कश आवाज, मोबाईलचे आवाज, स्वत: मुद्दामहून ओरडून विद्यार्थिनीना त्रस्त करून सोडतात. त्यामुळे खेडोपाड्यातील मुली घाबरून गेलेल्या असतात. पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचून अचानक कारवाई केल्यामुळे रोडरोमिओंची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. काही जणांनी तर गाड्या जागीच टाकून धूम ठोकली. पोलिसांच्या या कारवाईमुळे रोडरोमिओंना चांगलाच चाप लागला आहे.
यामध्ये अधिकार दत्तात्रय काशीद (वय २०), आशिष संभाजी देसाई (२२), आकाश तानाजी खोत (२०, तिघेही म्हसवे), आकाश सागर पाटील (२३), समीर विश्वास राऊळ (२०, दोघेही निष्णप), राहुल रघुनाथ राणे (२०, राणेवाडी) या सहा जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.