मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 08:09 PM2021-06-14T20:09:34+5:302021-06-14T20:11:48+5:30
Maratha Reservation Kolhapur : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घेण्यात चालढकल केली जात असल्याच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा, तसेच बैठक उधळून लावण्याचा इशारा दिल्यामुळे पोलिसांनी सोमवारी मराठा समाजातील ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या जिजाऊ फाउंडेशनच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात थोडी झटापट झाली.
कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घेण्यात चालढकल केली जात असल्याच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा, तसेच बैठक उधळून लावण्याचा इशारा दिल्यामुळे पोलिसांनी सोमवारी मराठा समाजातील ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या जिजाऊ फाउंडेशनच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात थोडी झटापट झाली.
यूपीएससी व एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी सचिन तोडकर, दिलीप पाटील, स्वप्निल पार्टे यांनी केली आहे. परंतु राज्य सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणून त्याचा निषेध तसेच या प्रश्नाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा इशारा दिला होता. रविवारी त्यांना पोलिसांनी आंदोलन करता येणार नाही, अशी नोटीस बजावली होती.
सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून कार्यकर्ते तेथे जमायला लागताच पोलिसांनी जादा कुुमक मागवून घेतली. साडेदहा वाजता तोडकर, पाटील, पार्टे यांच्यासह नितीन देसाई, संजय जमदाडे, भास्कर पाटील, पंकज कडवकर, धनश्री तोडकर आदी तीस ते पस्तीस कार्यकर्ते बाहेर पडत असताना पोलिसांनी त्यांना अडविले. या वेळी वादावादी, झटापट झाली. शेवटी सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नेले. दुपारी दोन वाजता अजित पवार कोल्हापुरातून बाहेर पडल्यानंतर सर्वांना सोडून देण्यात आले.