अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी पोलिसाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 06:35 PM2019-05-16T18:35:28+5:302019-05-16T18:37:44+5:30
पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसाने विनयभंग केला. चेतन दिलीप घाटगे (वय ३४, रा. मंडलिक पार्क, कोल्हापूर) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर : पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसाने विनयभंग केला. चेतन दिलीप घाटगे (वय ३४, रा. मंडलिक पार्क, कोल्हापूर) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, राजारामपुरी पोलीस ठाण्यात ५ मे २०१९ ला अल्पवयीन मुलगीला फूस लावून पळवून नेल्याबाबतचा गुन्हा नोंद झाला आहे. त्यातील अल्पवयीन मुलगी १४ मे रोजी पोलीस ठाण्यात हजर झाली. यावेळी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी या सुट्टीवर असल्याने दुसऱ्या अधिकाऱ्यांना याबाबत जबाब घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
यावेळी संबंधित मुलीच्या पालकांना बोलावून घ्या, ते न आल्यास तिला बालसुधारगृहात पाठवा, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार एक महिला पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस नाईक चेतन दिलीप घाटगे यांनी त्या अल्पवयीन मुलीचे जबाब घेतले. दुसऱ्या दिवशी १५ मे रोजी त्या मुलीची आरोग्य तपासणी करण्यात आली.
दरम्यान, तिने जबाबावेळी घाटगे याने आपल्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून तिच्या आईने याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याची शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी शहानिशा केली.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता घाटगेविरोधात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. त्याचबरोबर पहाटे पाच वाजता त्याला अटक करण्यात आली. दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपास पोलीस करत आहेत.
अंतर्गत वादातून घाटगेला गोवल्याची चर्चा
पोलीस नाईक घाटगे हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असून, याच पोलीस ठाण्यातील अंतर्गत वादातून त्याला गोवण्यात आल्याची चर्चाही पोलीस वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक चेतन घाटगे याच्याविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.
- डॉ. अभिनव देशमुख,
पोलीस अधीक्षक