पोलिसांवरील हल्ला पडला महाग--माजी उपमहापौर यांच्यासह ४० जणांना लागणार मोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 02:41 PM2019-04-10T14:41:31+5:302019-04-10T15:03:44+5:30
शहरातील यादवनगर-पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करून सर्व्हिस पिस्तूल जबरदस्तीने काढून घेत रोखल्याने माजी उपमहापौर शमा मुल्लासह २० जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र या प्रकरणात कायद्याने या सर्वांच्या आणखीनच चांगल्या मुसक्या आवळल्या आहेत.
कोल्हापूर : शहरातील यादवनगर-पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करून सर्व्हिस पिस्तूल जबरदस्तीने काढून घेत रोखल्याने माजी उपमहापौर शमा मुल्लासह २० जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र या प्रकरणात कायद्याने या सर्वांच्या आणखीनच चांगल्या मुसक्या आवळल्या आहेत. आज सकाळी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी विशेष पोलीस महासंचालक संदीप वारके यांच्याकडे तत्काळ या सर्वांना मोका लावण्यासाठी प्रस्ताव मंजूरीला पाठविला आहे. यावर सायंकाळी सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास देशमुख यांनी पत्रकारांना दिला आहे. पोलीस महासंचालक यांनीही अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार बैठकीत सांगितले पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज आणखी चौघांना अटक करण्यात आली त्यात निलेश दिलीप काळे राजू येशील सुंदर रावसाहेब दाभाडे व जावेद मुल्ला यांचा समावेश आहे त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या पंचवीस झाले आहे मुख्य संशयित निलेश काळे याने वरिष्ठ अधिकारी शर्मा यांचे सुरक्षा रक्षक निरंजन पाटील यांच्यावर हल्ला करून सर्विस रिवाल्वर पळवून नेले होते लक्षतीर्थ वसाहत जवळ चौघांना शेतात पाटलाकडून पकडले असेही पोलीस अधीक्षक डॉक्टर देशमुख यांनी सांगितले यावेळी यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत आदी उपस्थित होते
या हल्ला प्रकरणातील सर्व संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मटकाचालक सलीम यासिन मुल्ला पिस्तूल घेऊन आपल्या साथीदारांसह पसार झाला होता. पोलिसांवर झालेल्या या हल्ल्याची पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. संशयितांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, एकत्र जमाव करून हाणामारी करणे, अवैध व्यवसाय चालविणे, अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये सुमारे ५० जणांचा समावेश आहे. पोलिसांनी १८ पानी पंचनामा तयार केला आहे. जास्तीतजास्त पुरावे गोळा करीत अधिक साक्षीदारांचे जबाबही पोलिसांनी घेतले आहेत.
प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक शर्मा यांचाही जबाब घेतला आहे. हल्ल्यामध्ये शर्मा यांचा बॉडीगार्ड निरंजन पाटील हा जखमी झाला आहे. मंगळवारी दिवसभर संशयितांची धरपकड सुरूहोती. अजूनही तपास वेगाने केला जात असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक वाढावा व कायद्याची ताकद समजावी यासाठी आता पोलिसांनी कठोर पाऊल उचलले असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणात संबंधित संशयित गुन्हेगारांवर काय कारवाई होणार हा चर्चेचा विषय बनला होता.
अटक झालेल्यांची नावे
माजी उपमहापौर शमा सलीम मुल्ला (वय ४२), तौफिक सद्दाक शिकलगार (३८, रा. सदर बझार), फिरोज खलील मुजावर (५७), शाहरुख रफीक लाड (वय २४), जावेद शौकत नाचरे (२१), अजय बाळासाहेब कांबळे (वय ४७), शाहरुख रफीक लाड (२४) , उमेर मुजाहिद मोमीन (२०) साहिल नियाज मुजावर (२०), ओंकार रवींद्र पारीसवाडकर (३३), आकाश लक्ष्मण पोवार (१८),रोहित बाळू गायकवाड (४५), टिपू मुल्ला (३०), सुनिल दाभाडे (३५), सज्जाद ईसाक नाईकवडी (५२, सर्व, रा. यादवनगर), दिलीप वामन कवडे (४०, रा. सदर बझार), विजय मारूती सांगावकर (४३, रा. शाहूनगर), अरिफ रफिक शेख (२४, रा. बीडी कामगार वसाहत), जमीर साहेबजी मुल्ला (२८, रा. राजारामपुरी, माउली पुतळा), श्रीधर शिवाजी कांबळे (२३), साहिल आमिन नदाफ (२४), मुश्रीफ पठाण (२१), इमाम आदम शेख (४०, सर्व रा. शास्त्रीनगर), रोहित बाळू गायकवाड (४५)
बुधवारी अनेक वृत्तपत्रांनी पोलिसांची गुन्हेगारावरील सुटत चाललेली पकड व पोलिसांच्या आशिर्वादानेच सुरु असलेले हे अवैध धंदे तसेच आता थेट पोलीसच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हल्ला करण्याचे त्यांचे वाढलेले धाडस यावर चांगलेच ताशेरे ओढल्याने संपूर्ण पोलीस दलाची चांगलीच नाचक्की झाली आहे. सर्वसामान्यांना कायदा व गुन्हेगारांना अभय असाच प्रकार अनेक पोलीस ठाण्यातून सुरु असल्याचे खुलेआम नागरिक बोलत होते. अनेक तक्रारी करूनही अवैध धंदे सुरुच होते. शहरात अजूनही अनेक ठिकाणी विविध अवैध धंदे सुरु आहेत. त्यामुळे पोलिसांनी हा घेतलेला मोका कायद्याचा आधार कितपत यशस्वी होतोय हे महत्वाचे आहे. पोलिसांनी आपला कायदा सक्षम राबवावा अशीच जनतेतून मागणी आहे.