पोलिसाकडून पत्नीला मारहाण, दोघांविरोधात फिर्याद : अदखलपात्र गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:20 AM2020-01-21T11:20:44+5:302020-01-21T11:21:54+5:30
कौटुंबिक वादातून विभक्त असलेली पत्नी घरी आल्याच्या रागातून पोलिसाने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. रश्मी अमर आडसुळे (वय ३५, रा. मंगळवार पेठ) असे जखमीचे नाव आहे.
कोल्हापूर : कौटुंबिक वादातून विभक्त असलेली पत्नी घरी आल्याच्या रागातून पोलिसाने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. रश्मी अमर आडसुळे (वय ३५, रा. मंगळवार पेठ) असे जखमीचे नाव आहे.
याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल अमर दत्तात्रय आडसुळे (वय ४०, रा. माजगावकर कॉलनी, कणेरकरनगर) व सायबर विभागातील महिला कॉन्स्टेबल स्मिता सचिन माने (रा. पुलाची शिरोली, ता. करवीर) यांच्याविरोधात रविवारी रात्री जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, रश्मी आडसुळे व अमर आडसुळे हे नात्याने पती-पत्नी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्या विभक्त राहतात. १९ जानेवारीला त्या पती राहत असलेल्या कणेरकरनगर येथील घरी गेल्या.
यावेळी अमर यांनी रश्मी यांना तु का आली आहेस, तुला नोटीस पाठविली आहे, असे म्हणून घरातून बाहेर ढकलून केसांना धरून मारहाण केली. तसेच स्मिता माने यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, रश्मी आडसुळे यांनी सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पती अमर आडसुळे व माने या दोघांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.