कोल्हापूर पूर: जलप्रलय पाहणाऱ्या हौशींना पोलिसांकडून चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 09:24 PM2019-08-06T21:24:21+5:302019-08-06T21:24:44+5:30
Kolhapur Flood: महापुराचा धोका वाढत असल्याने जिल्हा पोलिस दलाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील शिवाजी पुल आणि राष्ट्रीय महामार्गावर पूर पाहण्यासाठी आलेल्या हौशींना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. जवाहरनगर परिसरातील रेणुका मंदिर परिसरातही काही तरुण पाण्यात पोहत होते. दिवसभरात शंभराहून अधिक हौशींना पोलिसांना हटकले. पुन्हा पुराच्या पाण्याच्या गेल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. पूरस्थितीत राष्ट्रीय महामार्गासह पूरग्रस्त असलेल्या भागात पोलिसांचा रात्रदिवस पहारा सुरु आहे. जिल्ह्यात १ हजार पोलिसांसह १२०० होमगार्ड तैनात केले असून पोलिस प्रशासन २४ तास दक्ष आहे.
महापुराचा धोका वाढत असल्याने जिल्हा पोलिस दलाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, जिल्हा विशेष शाखेचे शशिराज पाटोळे यांच्यासह जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यातील कर्मचारी पूरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. पाण्याखाली गेलेले बंधारे, पूल आणि रस्त्यांवर दुर्घटना घडू नयेत, यासाठी बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक दहा मिनिटाला प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पूरस्थितीचा आढावा वरिष्ठाकडून घेतला जात आहे. ही स्थिती गंभीर असल्यास जादा पोलिस मदतकार्यासाठी पाठविले जात आहेत. मंगळवारी काही हौशींनी पुराचे पाणी पाहण्यासाठी रत्नागिरी रोडवरील शिवाजी पूल, राष्ट्रीय महामार्गावरील पूल, कळंबा तलाव, व्हिनस कॉर्नर, शाहूपुरी, दुधाळी परिसरात गर्दी केली. काही तरुण पुराच्या पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत होते. तर पाण्यात उभे राहून सेल्फी काढत होते. या तरुणांना पोलिसांनी हटकले. हायवेवरील पुलावरही गर्दी होऊ लागल्याने पोलिसांनी या ठिकाणाहून तरुणांना पांगविले.
दरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीला शीघ्रकृती दलाचे एक पथक तैनात केले आहे. याशिवाय १२०० होमगार्डही जिल्ह्यात विविध ठिकाणी तैनात केले आहेत. शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी यासह कदमवाडी, जाधववाडी , बापट कॅम्प येथील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी शीघ्र कृती दलाचे जवानांनी मदत केली. पोलिसांच्या मदतीसाठी १२०० होमगार्ड रवाना झाले आहेत.