नागरिकांच्या संपर्कासाठी पोलीसांची सायकल गस्त : संजय मोहीते

By admin | Published: June 12, 2017 01:25 PM2017-06-12T13:25:03+5:302017-06-12T13:25:03+5:30

दसरा चौकातून हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ

Police bicycle patrol for citizens' contact: Sanjay Mohite | नागरिकांच्या संपर्कासाठी पोलीसांची सायकल गस्त : संजय मोहीते

नागरिकांच्या संपर्कासाठी पोलीसांची सायकल गस्त : संजय मोहीते

Next


आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १२ : शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच नागरिकांचा संपर्क वाढावा, हा उद्देश समोर ठेवून पोलीसांची सायकल गस्त हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. मुंबई पाठोपाठ कोल्हापूरात पोलीस सायकलवरून दिवस-रात्र शहरात गस्त घालतील. या नवीन गस्तीचा प्रारंभ पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून होत आहे.


चाळीस वर्षांपूर्वी पोलीस सायकलवरून गस्त घालीत होते. त्यानंतर सायकलची जागा दुचाकीने घेतली. सध्या पोलीस दलात दुचाकी व चारचाकीमधून पोलीस दिवसा-रात्री गस्त घालत असतात. अशा वेळी एखाद्या कॉलनीत चोरटा शिरला असेल तर वाहनाच्या आवाजाने तो लपून बसतो. ते निघून गेल्यानंतर चोरी करून तो पसार होतो. अशा वेळी आवाज न होता पोलीस शहरात, उपनगरांत सर्वत्र फिरू लागले तर त्यांना चोरटे दिसून येतील आणि होणाऱ्या घरफोड्या वाचतील, हा उद्देश समोर ठेवून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शहरात पोलिसांना सायकलवरून गस्त घालण्यास सक्ती करा, असे आदेश पोलीस अधीक्षक मोहिते यांना दिले. त्यानुसार त्यांनी ३५ सायकली खरेदी केल्या आहेत.

शहरात राजारामपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर अशी पाच पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यास पाच सायकली देण्यात आल्या आहेत. या सायकलीवर पुढे ‘कोल्हापूर पोलीस’ नावाची पाटी आहे. त्यानंतर प्रत्येक सायकलीवर ज्या-त्या पोलीस ठाण्याचे नाव आहे.


दिवसा व रात्री ठराविक वेळेत हे पोलीस शहरात गस्त घालणार आहेत. प्रत्येक पोलिसाला क्रमवार पद्धतीने ही गस्त सायकलवरून घालावी लागणार आहे. प्रदूषणमुक्त, इंधन बचत, आरोग्यास लाभदायक असा या सायकल गस्तीचा फायदा पोलिसांना होणार आहे.

मुंबई पोलीसांनी असा उपक्रम सुरु केला आहे. कोल्हापूरातही सकाळी दोन तास व रात्री दोन तास सायकलीने गस्त घालण्यात येत आहे. या उपक्रमाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे, महिनाभरानंतर या उपक्रमाचा फायदा लक्षात येईल. ग्रामीण भागात या उपक्रमाचा चांगलाच फायदा होणार आहे.
- विश्वास नांगरे-पाटील,
विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

Web Title: Police bicycle patrol for citizens' contact: Sanjay Mohite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.