पोलिसांचा मंडळांना दणका, डॉल्बीचा आवाज केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:13 AM2017-08-26T01:13:11+5:302017-08-26T01:13:11+5:30

कोल्हापूर : राजारामपुरी परिसरातील काही गणेश मंडळांनी दादागिरी करत पोलीस प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवत शुक्रवारी सायंकाळी मिरवणुकीत डॉल्बी लावला. मात्र, पोलिसांनी हा प्रकार हाणून पाडत तत्काळ त्या डॉल्बीचे मिक्सर जप्त करत धडक कारवाई केली.

 The police boards, the sound of the dolby and the sound of the ball | पोलिसांचा मंडळांना दणका, डॉल्बीचा आवाज केला बंद

पोलिसांचा मंडळांना दणका, डॉल्बीचा आवाज केला बंद

Next
ठळक मुद्देचारहून अधिक मंडळांचे डॉल्बी मिक्सर जप्त

; मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रोखली मिरवणूक; पोलीस प्रशासनाची भूमिका ठाम; काही काळ गोंधळ; जनता बझार चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : राजारामपुरी परिसरातील काही गणेश मंडळांनी दादागिरी करत पोलीस प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवत शुक्रवारी सायंकाळी मिरवणुकीत डॉल्बी लावला. मात्र, पोलिसांनी हा प्रकार हाणून पाडत तत्काळ त्या डॉल्बीचे मिक्सर जप्त करत धडक कारवाई केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होऊन मिरवणूक तब्बल सहा तासांहून अधिक काळ जनता बझार चौकात मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली. पोलीस प्रशासन व मंडळाच्या कार्यकर्ते आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने रात्री उशिरापर्यंत ‘जैसे थे’च चित्र होते.

राजारामपुरी परिसरात सायंकाळी गणेश आगमन मिरवणुकीचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, युवा नेते ऋतुराज पाटील, ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, अनिल घाटगे,आदींच्या उपस्थितीत झाले. मात्र, मिरवणुकीच्या सुरुवातीपासूनच काही मंडळांनी डॉल्बी लावण्याची तयारी केली होती; परंतु पोलीस प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बी लावण्यास परवानगी नाकारल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आमदार क्षीरसागर यांना विनंती केली. त्यानुसार त्यांनी त्या परिसरातील एका उपहारगृहात शहर पोलीस उपअधीक्षक अमृतकर यांच्यासमवेत बैठक घेतली.

यावेळी त्यांच्यात जवळपास पाऊणतास चर्चा झाली. यावेळी आमदारांनी न्यायालयाच्या अधीन राहून जी परवानगी दिली आहे, त्यानुसार मंडळांना साउंड सिस्टीम लावण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. मात्र, शहर पोेलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकरांनी हा न्यायालयाचा निर्णय आहे; त्यामुळे त्यात आमचा काहीच हस्तक्षेप नाही. आम्ही केवळ अंमलबजावणी करत आहोत. त्यामुळे न्यायालयाचे निर्देश पाळणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यामुळे मंडळांनी डॉल्बी लावण्याचा आग्रह धरू नये, असे सांगत ते बाहेर पडले.

त्यानंतर त्यांच्यासमोरच जनता बझार चौकात एका मंडळाने डॉल्बी लावून त्याचा आवाज वाढविल्याने त्यांनी तत्काळ पोलीस फौजफाट्यासह त्या ठिकाणी जाऊन त्या डॉल्बीचा मिक्सर जप्त केला. त्यानंतर त्यांनी राजारामपुरी मुख्य रस्त्यावरील मिरवणूक मार्गावर संचलन करत ज्या-ज्या मंडळांचे डॉल्बी आहेत व त्यांनी ते लावले आहेत, अशा मंडळांचे डॉल्बी मिक्सर जप्त केले. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. मंडळांनी जनता बझार चौकात मिरवणूक थांबविली.

जोपर्यंत डॉल्बी लावण्यास परवानगी मिळत नाही, तोपर्यंत पुढे न जाण्याच्या भूमिकेवर मंडळांचे कार्यकर्ते ठाम राहिले. पोलीस प्रशासनानेही आपल्या भूमिकेवर ठाम राहत, डॉल्बीशिवाय मिरवणूक सुरू करायला हरकत नाही, असे सांगितले. तरीही मंडळांनी आपला ठेका कायम ठेवल्याने सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत चर्चेच्या अनेक फेºया झाल्या. यात लोकप्रतिनिधी, मंडळांचे कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी पोलिसांना व मंडळांना मिरवणूक सुरू करण्याची विनंती केली; परंतु मंडळांनीही डॉल्बीशिवाय मिरवणूक पुढे नेण्यास नकार दिला. यामुळे मिरवणूक सहा तासांहून अधिक काळ ठप्प होती.


एफ.सी. गु्रपच्या कारवाईने सुरुवात
राजारामपुरी माळी कॉलनी परिसरातील एफ.सी. गु्रप या मंडळाने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परवानगी नसतानाही थेट डॉल्बी लावून त्याचा आवाज वाढविल्याने तेथे उपस्थित असलेले उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी पोलिसांसह जाऊन डॉल्बीचा मिक्सर जप्त केला. त्यानंतर एक-एक करीत जवळपास चार मंडळांच्या डॉल्बीचे मिक्सर जप्त करून ताब्यात घेतले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ‘आमचे मिक्सर परत द्या, आम्ही वाजवत नाही,’ असे सांगितले; परंतु डॉ. अमृतकर यांनी त्यास नकार दिला.

अप्पर पोलीस अधीक्षक दाखल
मिरवणूक ठप्प झाल्याचे समजताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सुहेल शर्मा हे जनता बझार चौकात दाखल झाले. त्याचबरोबर राज्य राखीव दलाचे आणखी एक पथक दाखल झाले. त्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले.

राजकीय पदाधिकाºयांनी केली विनंती
मिरवणूक ठप्प झाल्याचे समजताच शिवसेनेच्या बूथवरून जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस यांच्यासह पदाधिकारी रात्री आठच्या सुमारास जनता बझार चौकात आले. त्यांनी डॉ. अमृतकर यांची भेट घेऊन मिरवणूक सुरू करण्याची विनंती केली. यावर डॉ. अमृतकर यांनी आमची काहीच हरकत नसल्याचे सांगत डॉल्बीविरहित मिरवणूक काढावी असे सांगितले. यामुळे त्यातून काहीच तोडगा निघाला नाही. या दरम्यान भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांच्यासह राजारामपुरी संयुक्त मित्र मंडळाचे कमलाकर जगदाळे, रघुनाथ टिपुगडे, संजय काटकर यांच्यासह कार्यकर्त्यांनीही विनंती केली; परंतु डॉ. अमृतकर यांनीही डॉल्बीविरहित मिरवणूक काढण्यास आपली हरकत नाही, असे सांगितले.

पुन्हा बैठक निष्फळ
रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास आमदार सतेज पाटील मिरवणुकीच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी डॉ. अमृतकर यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागरही उपस्थित होते. जवळपास पाऊण तास चर्चा सुरू होती; परंतु डॉ. अमृतकर डॉल्बी न लावण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने ही बैठक निष्फळ ठरली.

जितका वेळ थांबायचे तेवढे थांबा!
अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मंडळांना डॉल्बीविरहित मिरवणूक काढण्याची विनंती केली; परंतु मंडळांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत जागेवरून न हलण्याचा निर्णय घेतला. यावर शर्मा यांनी ‘जितका वेळ थांबायचे तितका वेळ थांबा. आमची काहीच हरकत नाही, आम्ही कायद्याचे पालन करणारच,’ असे सांगितले.

दोन आमदारांची शिष्टाई निष्फळ
डॉल्बी लावण्यास पोलिसांनी परवानगी न दिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याकडे परवानगीबाबत आग्रह धरला. त्यानुसार आ. पाटील यांनी प्रथम पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांच्याशी चर्चा केली; परंतु त्यातूनही मार्ग न निघाल्याने ते आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमवेत रात्री पोलीस अधीक्षकांना भेटायला निघाले. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी त्यांची भेट घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसारच पोलीस प्रशासन म्हणून भूमिका बजावत असून सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती दोन्ही आमदारांनी केली. त्यामुळे आ. पाटील व आ. क्षीरसागर हे पोलीस अधीक्षकांना न भेटताच अप्पर पोलीस अधीक्षक शर्मा यांच्यासमवेत मंडळांच्या कार्यकर्त्यांसमोर आले. या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक शर्मा यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून डॉल्बी लावू नका; ही भूमिका मांडली; परंतु मंडळांचे कार्यकर्ते ‘डॉल्बी लावणारच’ या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी गणपतीची महाआरती करून रात्री उशिरापर्यंत मिरवणूक रोखून धरली. कार्यकर्त्यांसाठी दोन्ही आमदारांनी केलेली शिष्टाई निष्फळ ठरली.

 

Web Title:  The police boards, the sound of the dolby and the sound of the ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.