पोलीस आले धावून, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:57+5:302021-04-20T04:26:57+5:30
कोल्हापूर : कोरोना रोगाच्या दुसऱ्या लाटेतील वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यांची ...
कोल्हापूर : कोरोना रोगाच्या दुसऱ्या लाटेतील वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यांची चौकशी करावी, विशेष काळजी घेऊन त्यांच्या मदतीला धावून जावे, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या. जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मासिक बैठकीत त्यांनी उपविभागीय अधिकारी, सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी, अंमलदारांना त्याबाबतच्या सूचना केल्या.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्यावतीने त्यांच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांना रोज फोन करून त्यांची चौकशी करणे, त्यांच्या मनातील भीती काढून टाकून त्यांना भावनिक व मानसिक आधार देणे, ज्येष्ठ नागरिक एकटे राहत असतील तर त्यांना औषध पुरवठ्यासह इतर तातडीची मदत पुरवणे आदीबाबत अभिनव उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक करून हाच उपक्रम जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबवावा, अशा सूचना त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी पोलीस अधिकारी यांना दिल्या.
ज्येष्ठ नागरिकांची घ्यावयाची काळजी..
- ज्येष्ठ व एकट्या राहणाऱ्या नागरिकांच्या घरी भेट देणे
- अत्यावश्यक सेवा गरज भासल्यास उपलब्ध करून देणे
- औषध इत्यादीसाठी बाहेर पडू शकत नसलेल्यास ती त्यांना घरी उपलब्ध करून देणे
- लोकल बीट मार्शलचे संपर्क क्रमांक देणे
- ज्येष्ठ व एकट्या राहणाऱ्या नागरिकांनी अत्यावश्यक अथवा तातडीच्यावेळी पुढील नंबरवर संपर्क साधावा..
फोन नं. ८६३२६७३९९७ (महिला दक्षता सेल), ७२१८०३८५८५ (व्हॉट्स अप नंबर)
दूरध्वनी क्र. (०२३१) २६५६७११, २६०१९५०, २६६२३३३