पोलिसांची ‘टोपी’, ‘काठी’ झाली गायब..!

By Admin | Published: April 26, 2015 10:54 PM2015-04-26T22:54:18+5:302015-04-27T00:17:24+5:30

जिल्ह्यातील स्थिती : पोलीस दलाचा चेहरा बदलला; कडक शिस्त गेली काळाच्या पडद्याआड

Police 'capi', 'Kathi' disappeared! | पोलिसांची ‘टोपी’, ‘काठी’ झाली गायब..!

पोलिसांची ‘टोपी’, ‘काठी’ झाली गायब..!

googlenewsNext

सचिन लाड -सांगली  झुबकेदार मिशा... धिप्पाड शरीरयष्टी... नकळत पोट सुटलेले... हातात वेताची काठी... अंगात खाकी वर्दी... डोक्यावर टोपी... पायात काळा बूट... ही पोलिसांची खरी ओळख. गावात चुकून जरी पोलीस दिसला की, पळताभुई व्हायची. एक-दोन पोलिसांवर गावोगावच्या यात्रा, मिरवणुका पार पडायच्या. वरिष्ठ अधिकारीही कडक शिस्तीचे. पण ही परिस्थिती आता बदलली आहे. पोलिसांच्या डोक्यावरील ‘टोपी’ व हातातील ‘काठी’ गायब झाली आहे. सायकलच्याजागी दुचाकी आणि काठीऐवजी हातात मोबाईल आला आहे.प्राचीनकालीन... ब्रिटिशकालीन... आणि स्वातंत्र्योत्तर काळातील पोलीस... असा पोलीस दलात व त्यांच्या गणवेशात सातत्याने बदल होत गेला. सुरुवातीला ‘हाफ’ पॅन्टवाला पोलीस होता. दोन पोलिसांची जोडी हातात काठी घेऊन गस्त घालायला फिरायची. आजही हिंदी आणि मराठी सिनेमात अशा पोलिसांच्या भूमिका पाहायला मिळतात. हाफ पॅन्ट जाऊन फुल पॅन्ट आली. लाकडी काठ्या जाऊन फायबरच्या नव्या आकर्षक काठ्या आल्या. पूर्वी बहुतांश पोलिसांकडे सायकली होत्या. ड्युटीवर जाताना घरातूनच ते गणवेश करून निघायचे. ड्युटी संपवून घरी आल्यानंतरच डोक्यावरची टोपी काढायची. सायकलवरून कुठेही जाताना वेताची काठी नेहमी अडकविलेली असायची. गणवेशाशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर जाण्याचे ते धाडस करीत नव्हते.
अलीकडच्या काळात गणवेश परिधान केलेले पोलीस अभावानेच पाहावयास मिळतात. मोटारसायकली आल्यानंतरही काठी त्यांच्यासोबत होतीच. दुचाकीला काठी अडकविण्याची खास सोय होती. काठी अडकविलेली दुचाकी म्हणजे पोलिसाची, अशी खास ओळख होती. मात्र आता दुचाकीची काठीही गायब झाली आहे. पोलीस दलात नव्याने भरती झालेल्यांच्या हातात काठी व डोक्यावर टोपी कधीच दिसत नाही. एखादी घटना घडली आणि मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असेल तरच त्यांच्या डोक्यावर टोपी व हातात काठी दिसते. कामावर जाताना व परतताना खाकी वर्दीवर साधा शर्ट चढविलेला असतो. कामावर असताना टोपी खिशात असते. काठीऐवजी हातात मोबाईल असतो. अनेक पोलिसांच्या काठ्या घरी किंवा पोलीस ठाण्यात असतात.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्वीची गस्तही अनोखी असायची. पोलीस गणवेश परिधान करुन सायकलवरुन फिरायचे. रात्री बारा वाजले की, रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रत्येकाला थांबवून चौकशी करायचे. चित्रपट पाहून येणारे प्रेक्षकही त्यांच्या कचाट्यात सापडायचे. तिकीट दाखविले तर ते सोडायचे. यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाचे तिकीट जपून ठेवावे लागत असे. नंतर गस्त घालण्याच्या प्रकारातही बदल होत गेला. सध्या पोलीस गणवेश घालून गस्त घालताना कमीच दिसतात. साधा पोशाख घालून ते दुचाकीवरुन फिरताना दिसतात. रस्त्यावर पोलीस आहे, भीतीचे कारण नाही, असे आता रस्त्यावरुन फिरणाऱ्या सर्वसामान्य माणसाला वाटत नाही. नव्याने भरती झालेल्या तरुणांमुळे पोलीस दलाचा चेहरा बदललेला दिसतो. दिवसभरात एकदाही ते टोपी घालत नाहीत. कुठे काही घडल्यास जायचे असल्यास अधिकाऱ्यांनी काठी घेण्यास सांगितले की, मग ते काठ्या कुठे आहेत, याचा शोध घेतात.


खबऱ्यांचं नेटवर्क कुठायं?
नव्याने भरती झालेल्या तरुणांना पोलीस ठाण्यातील कामकाज शिकून घेण्याची मानसिकता दिसत नाही. पंचनामा कसा करावा, जबाब व फिर्याद कशी नोंदवून घ्यावी, याची त्यांना माहिती नाही. सध्या जुन्या पोलिसांच्या अनुभवावरच कामकाज सुरू आहे. जुने पोलीसही त्यांना काही येत नाही, म्हणून त्यांच्या नादाला लागत नाहीत. खबऱ्यांचे नेटवर्क काय असते, याचीही त्यांना माहिती नाही. त्यामुळे त्यांच्याकडून ठोस कामगिरी होताना दिसत नाही. अंगावर ‘खाकी’ वर्दी नको, म्हणून गुप्त शाखा, डीबी शाखा किंवा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात नोकरी करण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते.

Web Title: Police 'capi', 'Kathi' disappeared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.