पोलीस मित्राकडूनच पोलिसांना ‘चुना’
By Admin | Published: September 18, 2014 11:42 PM2014-09-18T23:42:46+5:302014-09-19T00:16:44+5:30
गुटख्याचा अवैध कारखाना : पोलीस यंत्रणेलाही आश्चर्याचा धक्का
इचलकरंजी : पोलीस मित्रानेच गुटखा तयार करण्याचा अवैध कारखाना सुरू केल्याची माहिती येथील पोलीस व अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत उघड झाली. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली पोलिसांवर कारवाई ठरणारा राजू पाच्छापुरे कारखान्याचा चालक निघाल्याने पोलीस यंत्रणेलाही आश्चर्याचा धक्का बसला. बंदी असलेल्या गुटख्याचेच उत्पादन व वितरण करीत राजूने पोलिसांनाच (गुटख्यातील) ‘चुना’ लावला.
येथील सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांना जुना चंदूर रस्त्यावरील गुटखा उत्पादनाच्या कारखान्याचा सुगावा लागला. अवैध गुटख्याच्या कारखान्यावरील कारवाई ही बाब अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या अखत्यारितील असल्याने चैतन्य यांनी ‘अन्नभेसळ’च्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. पोलीस व ‘अन्नभेसळ’च्या पथकाने संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत गुटख्याचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याचे पितळ उघड पडले. त्या कारवाईनंतर मिळालेल्या माहितीवरून बालाजीनगर व सोलगे मळा येथेही छापे घातले.
या कारवाईत गुटखा उत्पादनासाठी आवश्यक असणारी यंत्रे, सुगंधी सुपारी, तंबाखू पावडर, चुना असा कच्चा माल, तयार गुटख्याचे पॅकिंग असे साहित्य मिळाले. याशिवाय वाहतुकीसाठी वापर होणारे दोन टेम्पो, मोपेड असा एक कोटी ४७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हाती लागला. गेले काही महिने या गुटख्याचे अवैध उत्पादन सुरू होते; मात्र याचा कोणताही संशय-सुगावा पोलिसांना लागला नव्हता, याचेच आश्चर्य नागरिकांना वाटत आहे. गुटखा कारखान्यावर कारवाई होऊन दोन दिवस उलटले तरी अद्याप राजू व त्याचा साथीदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. (प्रतिनिधी)
राजूचा पोलिसांवर दबाव
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनाच जाळ्यात ओढून राजू पाच्छापुरे याने ‘दबाव’ निर्माण केला होता. नंतर तो पोलिसांचा मित्रही झाला. त्याचाच फायदा घेत त्याने अवैध गुटख्याची निर्मिती सुरू केली. अशा प्रकारे पोलिसांशी असलेली सलगीची मैत्री याचाच ‘फायदा’ राजूला मिळाला. अशा राजूने गुटखा निर्मितीसाठी आवश्यक असणारे कोट्यवधींचे भांडवल उभारले कसे, हाच विषय संशोधनाचा आहे.