पोलिसांनी शहरात केले वाहन संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:25 AM2021-04-21T04:25:04+5:302021-04-21T04:25:04+5:30
कोल्हापूर : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून वाहनांतून संचलन ...
कोल्हापूर : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून वाहनांतून संचलन करून लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दिला. बुधवारपासून फक्त सकाळी ७ ते ११ या वेळेतच व्यवसाय सुरू राहतील, त्यानंतर लॉकडाऊन असेल अशा सूचना पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून दिल्या.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन पुकारण्यात आले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे बुधवारपासून सकाळी ७ ते ११ व्यवसाय सुरू राहणार आहेत. त्यानंतर दिवसभर व्यवसाय बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, श्रीकृष्ण कटकधोंड, सीताराम डुबल, शहर वाहतूक शाखेच्या स्नेहा गिरी हे वरिष्ठ अधिकारी आपल्या फौजफाट्यासह छत्रपती ताराराणी चौकात एकत्र आले. तेथून शहरातील प्रमुख मार्गावरून वाहनांसह संचलन केले. संचलन करताना ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सूचना केल्या. संचलनात आठ पोलीस अधिकाऱ्यांसह ५० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. संचलनात २० दुचाकी, १२ चारचाकी वाहने सहभागी झाली होती.