पोलिसांनीच लाटले ९ कोटी!
By admin | Published: April 16, 2017 11:19 PM2017-04-16T23:19:01+5:302017-04-16T23:19:01+5:30
वारणानगरातील चोरी प्रकरण : सांगलीतील दोन अधिकारी, पाच पोलिसांसह सातजणांवर गुन्हा
कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील ३ कोटींच्या चोरी प्रकरणात छापा टाकायला गेलेल्या पोलिसांनीच तेथे मिळालेले ९ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप केल्याचे तपासांत उघड झाले आहे. याप्रकरणी सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षकांसह सातजणांवर रविवारी पहाटे कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
संशयित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलिस हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (रा. जाखले, ता. पन्हाळा), प्रवीण भास्कर-सावंत (रा. वासूद, जि. सांगोला) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणाने कोल्हापूर-सांगली पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यांमध्ये सर्व संशयितांना तत्काळ अटक करण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी करवीर विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना दिले. तसेच त्यानुसार गुन्हा दाखल होताच कोडोली पोलिसांचे विशेष पथक सांगलीला रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणीही मिळून आले नाही. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाचा पुढील तपास रात्री उशिरा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे वर्ग करण्यात आला आहे.
मार्च २०१६ मध्ये सांगली पोलिसांनी मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे तीन कोटींची रक्कम उघडकीस आणली होती. त्यानंतर तपासामध्ये वारणानगर येथील शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मध्ये चोरी करुन आपण ही रक्कम आणल्याचे मैनुद्दीन मुल्लाने कबूल केल्याने पोलिसांनी वारणानगरातील या रुमवर छापा टाकला असता तेथे आणखी एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये मिळाल्याचे पोलिसांनी दाखविले होते. त्यानंतर कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक व मल्टिडेव्हलपर्सचे मालक झुंजार माधवराव सरनोबत यांनी ही रक्कम आपली असल्याचे सांगून ३ कोटी १८ लाख रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद कोडोली पोलिसांत दिली.त्यानंतर सांगली पोलिसांनी मैनुद्दीनचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे दिला. येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना कॉलनीतील रूममध्ये आणखी एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये मिळाले. सुमारे सव्वा चार कोटींची बेहिशेबी रक्कम सापडल्याने कोल्हापूर-सांगली जिल्ह्णांत खळबळ उडाली होती. याचवेळी पोसिांनी याप्रकरणात मोठा ढपला पाडल्याची चर्चा सुरू होती.
सरनोबत यांच्या तक्रारीमुळे पर्दाफाश
मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्यानंतर सांगली-मिरज येथील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मैनुद्दीनला या प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्याचे आमिष दाखवून पैशांवर डल्ला मारला होता. बुलेट खरेदी प्रकरणात मिरज गांधी चौक पोलिस ठाण्याचा कॉन्स्टेबल इरफान नदाफ, त्याचा भाऊ साजिद नदाफ हे कागदोपत्री सापडले. त्यांना खात्यातून काढूनही टाकले; परंतु आणखी काहीजण रेकॉर्डवर यायचे होते. शिक्षक कॉलनीमध्ये सुमारे १४ कोटी ३४ लाख ५१ हजार रुपये होते. त्यापैकी तपासामध्ये सव्वा चार कोटीच समोर आले. उर्वरित रक्कम सांगली पोलिसांनी मैनुद्दीनला हाताशी धरून लाटली होती. या प्रकरणी झुंजार सरनोबत यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्याकडे स्वतंत्र तक्रार केली. त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना दिले. त्यांनी याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक चंदनशिवे यांच्यासह पंधरा पोलिसांकडे कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली.
जामिनासाठी प्रयत्न
आपल्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची चाहूल पोलिस निरीक्षक घनवट, चंदनशिवे यांच्यासह ‘त्या’ पाच पोलिसांना लागली होती. रविवारी गुन्हा दाखल होताच या सर्वांनी वकिलांकडे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या सर्वांचे सकाळपासून मोबाईल बंद होते.
कोल्हापुरातील छापा सांगली ‘एलसीबी’च्या अंगलट!
कारवाईतील गोलमाल : तीन कोटीचे ‘घबाड’ प्रकरण
सांगली : मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये गतवर्षी झोपडीत पकडलेले तीन कोटीचे ‘घबाड’ अखेर पोलिसांच्या अंगलट आले आहे. मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन मुल्ला याच्या मिरजेतील झोपडीवजा घरातून प्रत्यक्षात पकडलेली कोट्यवधीची रक्कम जास्त असल्याची चर्चा पहिल्यापासूनच होती. मिरजेतील दोन पोलिसांनी प्रथम पहिला हात मारला होता. या पोलिसांवर कारवाईही झाली आहे. मुल्लाने ही रक्कम वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील एका खोलीतून चोरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाने तिथे कारवाई केली. पण तेथील पोलिसांची मदत न घेता केलेली ही कारवाई त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे.
पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, कुलदीप कांबळे व रवींद्र पाटील यांच्या ‘टीम’ने पुढाकार घेऊन मैनुद्दीनच्या बेथेलहेमनगर येथील झोपडीवजा घरातून तीन कोटीचे ‘घबाड’ पकडले होते. मार्च २०१६ मध्ये केलेली ही कारवाई राज्यभर गाजली. सांगली, मिरजेतील पोलिसांना हे प्रकरण माहीत होते. सुरुवातीला मिरजेतील काही पोलिसांनी मैनुद्दीनवर कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडून लाखो रुपये उकळले.
मैनुद्दीनने नातेवाईकांच्या नावावर बुलेटसह अन्य महागड्या गाड्या खरेदी केल्या. ही बाब ‘एलसीबी’ला समजताच त्यांनीही या प्रकरणात प्रवेश केला. सुरुवातीला तीन कोटीचे ‘घबाड’ पकडले. तपासाची व्याप्ती कोल्हापूरच्या दिशेने गेली. दुसऱ्या जिल्ह्णात तपासाला जाताना वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक होते. पण त्यावेळचे तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख सुनील फुलारी यांच्याशी पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांचा वाद होता. या वादातून घनवट यांनी स्वत:च आपल्या विश्वासातील कर्मचारी घेऊन वारणानगर येथे छापा टाकला. त्यावेळी कोल्हापूर पोलिसांची मदतही घेतली नाही. तिथेही कोट्यवधीचे ‘घबाड’ सापडले. या घबाडात केलेल्या गोलमालामुळे ‘एलसीबी’चे हे सात मोहरे अखेर गळाला लागल्याची चर्चा आहे.