LokSabha2024: कोल्हापुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; पुंगळ्या काढलेल्या दुचाकी जाग्यावरच जप्त
By उद्धव गोडसे | Published: June 4, 2024 01:41 PM2024-06-04T13:41:00+5:302024-06-04T13:41:18+5:30
कर्तव्यात हलगर्जीपणा, पाच पोलिसांचे तात्पुरते निलंबन
कोल्हापूर : मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पुंगळ्या काढून दुचाकी फळवणा-या तरुणांना ताब्यात घेऊन दुचाकी जप्त केल्या जात आहेत. तसेच वरिष्ठ अधिका-यांच्या वायरलेस संदेशाकडे दुर्लक्ष केल्याने पाच पोलिसांवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाली.
मतमोजणीच्या ठिकाणी मंगळवारी सकाळी सहापासूनच बंदोबस्त तैनात केला आहे. मतमोजणी कर्मचारी, प्रतिनिधी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात आला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दोन्ही मतमोजणी केंद्रांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. रमण मळा आणि राजाराम तलाव या दोन्ही ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवली आहे. मतमोजणी केंद्रांकडे जाणारे मार्ग बॅरिकेटिंग करून बंद केले आहेत. दुचाकींच्या पुंगळ्या काढून हुल्लडबाजी करणा-या तरुणांना ताब्यात घेऊन दुचाकी जप्त केल्या जात आहेत.
पाच पोलिसांचे तात्पुरते निलंबन
वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी वायरलेसवरून दिलेल्या संदेशाला वेळेत प्रतिसाद न दिल्याने पाच पोलिसांवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सोमवारी रात्री ही कारवाई केली.