Kolhapur: शिंगणापुरात पोलिसांकडून हातभट्टीचे तीन अड्डे उद्ध्वस्त, तिघांना अटक; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
By उद्धव गोडसे | Published: April 27, 2023 04:39 PM2023-04-27T16:39:00+5:302023-04-27T16:40:19+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली कारवाई
कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) येथे गणेशनगर परिसरातील हातभट्टीच्या तीन अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलिसांनी गावठी दारू, कच्चे रसायन आणि दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. २६) रात्री उशिरा ही कारवाई केली.
याबाबत निखिल चंद्रकांत रजपूत (वय २१), अनिकेत चंद्रकांत रजपूत (वय १९) आणि नरेंद्र मारुती गागडे (वय ३८) या तिघांना अटक केली. तर अंबादास ठाकूरसिंग बागडे (सर्व रा. गणेशनगर, शिंगणापूर) याच्यासह चौघांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तीन हातभट्ट्या उद्ध्वस्त करून ४१०० लिटर कच्चे रसायन आणि ३१५ लिटर गावठी दारू जप्त केली. या कारवाईत सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, परीक्षाविधीन पोलिस उपअधीक्षक रवींद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे यांच्यासह २६ कर्मचा-यांच्या पथकाने सहभाग घेतला.