तत्काळ मदतीसाठी ‘डायल ११२’ हेल्पलाईन, मात्र नागरिकांच्या भलत्याच तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 01:14 PM2021-12-02T13:14:16+5:302021-12-02T13:26:59+5:30
‘११२’ ही हेल्पलाईन मारामारी, आत्महत्या, खून, जबरी चोरी, लुबाडणूक आदी गंभीर गुन्ह्यांत तत्काळ मदत मिळण्यासाठी ‘टोल फ्री’ची हेल्पलाईन आहे. बायको भांडतेच, नवरा दारु पिऊन गोंधळ घालतोय यासाठी कशाला हवी आहे ही हेल्पलाईन.
तानाजी पोवार
कोल्हापूर : आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत करण्यासाठी, घटनास्थळी वेळेत पोहोचण्यासाठी राज्यातील पोलीस दलाने अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोणतीही घटना घडल्यास तातडीने ‘११२’ नंबर डायल करा, अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी दाखल होतील. मात्र, फेक कॉल केल्यास गुन्हा दाखल होत असल्याने तसे फेक कॉल येत नसल्याचे या विभागातील पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले.
गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी व सर्वसामान्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी ‘डायल ११२’ ही नवी यंत्रणा राज्यभर विस्तारली. याचे नियंत्रण हे नवी मुंबईतून होत आहे. चोवीस तास ही ‘हेल्पलाईन’ सेवा सुरु आहे. ज्या भागातून फोन आला, त्या जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाला नवी मुंबईतून फोन जाऊन घटनास्थळाचे लोकेशन दिले जाते. त्या परिसरातील पोलिसांच्या बीट मार्शल व्हॅनला संदेश मिळताच तातडीने ती मदतीसाठी घटनास्थळी पोहोचते.
दोन महिन्यात १६८० कॉल
ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांत ‘डायल ११२’ या हेल्पलाईनला कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल १,६८० कॉल आले. यानंतर मदतीसाठी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने अनेक अनुचित घटना टाळण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या कार्यशैलीची प्रतिमा उंचावण्यास यामुळे मदत मिळत आहे.
फेक कॉल करणाऱ्यांवर गुन्हा
फेक कॉल करुन पोलिसांची दिशाभूल अथवा त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर गुन्हा दाखल होणार आहे. हा फेक कॉल करणारा कोण आणि त्याने तो कोठून केला, याचे लोकेशन समजणार आहे. त्यामुळे तातडीने त्याच्यावर कारवाई करता येणार आहे. अद्याप तरी ‘११२’ला गंमत म्हणून फेक कॉल करणाऱ्यांचे कॉल नंबर ब्लॉक केले जात आहेत. त्यामुळे अद्याप जिल्ह्यात तरी फेक कॉल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत.
बायको भांडतेय, यासाठी कशाला हवी मदत?
‘११२’ ही हेल्पलाईन मारामारी, आत्महत्या, खून, जबरी चोरी, लुबाडणूक आदी गंभीर गुन्ह्यांत तत्काळ मदत मिळण्यासाठी ‘टोल फ्री’ची हेल्पलाईन आहे. बायको भांडतेच, नवरा दारु पिऊन गोंधळ घालतोय यासाठी कशाला हवी आहे ही हेल्पलाईन. त्यामुळे या हेल्पलाईनला विनाकारण फोन करुन त्रास देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
तत्काळ मदतीसाठी ४२६ जणांची फौज
जिल्ह्यात ११२वर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस निरीक्षक जयसिंह रिसवडकर या अधिकाऱ्यांसह ४२६ पोलिसांची फौज आहे. त्याशिवाय तत्काळ घटनास्थळी पोहोचण्यासाठी ४० चारचाकी व ४६ दुचाकी कार्यरत आहेत. महेंद्र कंपनीचे अभियंते अमोल चौगुले, अरुण कांबळे हे तांत्रिक बाजू सांभाळत आहेत.
‘ही सेवा गंभीर घटनेत तत्काळ मदत करण्यासाठी आहे. त्यासाठी २४ तास पोलीस यंत्रणा सक्रिय आहे. निव्वळ गंमत म्हणून फेक कॉल करुन पोलिसांचा वेळ घालविणाऱ्यांना ते महागात पडणार आहे.’ - जयसिंह रिसवडकर, प्र. पोलीस निरीक्षक, ‘डायल ११२’.