पोलिसांनी शोधले पश्चिम बंगालच्या मुलीचे बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 01:07 PM2021-06-04T13:07:43+5:302021-06-04T13:10:37+5:30
Police Kolhapur : पोलिसांनी एखादे काम मनावर घेतले की ते काय करू शकतात याचे सुखद प्रत्यंतर एका कमी बुध्यांक असलेल्या पश्चिम बंगालमधील मुलीला आला. त्या मुलीच्या ओळखीच्या मुलाने तिला फसवून कोल्हापुरात आणले होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व करवीरचे पोलीस निरीक्षक सुनील कोळेकर यांनी प्रयत्न करून तिच्या वडिलांचा शोध लावला. सध्या ही मुलगी शासकीय वसतिगृहात असून लॉकडाऊन कमी झाल्यावर तिला वडिलांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
कोल्हापूर : पोलिसांनी एखादे काम मनावर घेतले की ते काय करू शकतात याचे सुखद प्रत्यंतर एका कमी बुध्यांक असलेल्या पश्चिम बंगालमधील मुलीला आला. त्या मुलीच्या ओळखीच्या मुलाने तिला फसवून कोल्हापुरात आणले होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व करवीरचे पोलीस निरीक्षक सुनील कोळेकर यांनी प्रयत्न करून तिच्या वडिलांचा शोध लावला. सध्या ही मुलगी शासकीय वसतिगृहात असून लॉकडाऊन कमी झाल्यावर तिला वडिलांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
घडले ते असे : ही मुलगी सुमारे १८ वर्षांची आहे. ती फक्त पश्चिम बंगालमधील तिच्या गावाचे नाव सांगते. तिच्या घरी असिफ आलम नावाचा मुलगा येत होता. त्याच्याशी झालेल्या ओळखीतून ती त्याच्याबरोबर घरातून निघून आली. काही दिवस मुंबईत राहिली. तिथे त्यांने मारहाण करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला परंतू तो या मुलीने उधळून लावला. त्या रागातून या मुलाने या मुलीस कोल्हापुरात आणले आणि सोडून तो पसार झाला.
काही दिवसांपूर्वी करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ती पोलिसांना मिळून आली. तिच्याशी संवाद साधल्यावर तिचा बुध्यांक कमी असल्याचे लक्षात आले. वयही निश्चित सांगता येत नव्हते. मतिमंद मुलांच्या शाळेत काम केलेल्या मुख्याध्यापिका स्वाती गोखले यांची मदत घेण्यात आली. त्यांनी सीपीआरकडून तिची तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिचे वयही समजले.
सीपीआरच्या तपासणीत तिचा बुध्यांक कमी असल्याचे स्पष्ट झाले. तिने सांगितलेल्या गावाच्या माहितीवर ती पश्चिम बंगालमधील पुर्लिया जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले . त्यानुसार पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पश्चिम बंगाल पोलिसांशी स्वत:हून संपर्क साधला व तिचे वडिल अन्वर इब्राहिम शेख यांचा शोध लागला.
मुलगी कोल्हापुरात असल्याचे समजल्यावर त्यांचाही जीव भांड्यात पडला. परंतू लॉकडाऊन असल्याने सध्या तिला न्यायला येता नसल्याने काही दिवसांसाठी या मुलीस शासकीय मुलींच्या वसतिगृहात ठेवण्यात आले. एका वाट चुकलेल्या मुलीला तिच्या वडिलांकडे सुपूर्द करणे हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे व त्यासाठीच सगळी धडपड केल्याची प्रतिक्रिया करवीरचे पोलिस निरीक्षक सुनिल कोळेकर यांनी व्यक्त केली.