गणेश मंडळांवर पोलिसांचा दांडगावा
By admin | Published: July 19, 2016 12:42 AM2016-07-19T00:42:54+5:302016-07-19T00:52:11+5:30
शांतता बैठक ‘अशांत’ : ‘हम करे सो’मुळे कार्यकर्ते संतप्त
इचलकरंजी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मुस्कटदाबी करत ‘हम करे सो कायदा’ अशी भूमिका पोलिसांनीच घेतल्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांसह गणेशभक्तांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव ‘विशेष’ जल्लोषात साजरा होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी चोख नियोजन करणे आवश्यक असताना बैठक घेऊन ‘स्टंट’ केल्याने पोलिस खात्यासह सामान्यांनाही याचा त्रास होईल, असे मत जाणकारांतून व्यक्त होत आहे.
येथील राजीव गांधी भवनमध्ये सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची शांतता बैठक घेण्यात आली. पोलिस ठाण्यातील नवख्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून काही पोलिसांनी या बैठकीचे आयोजन केले होते. गणेश मंडळांना सोशल मीडियातून संदेश दिला गेला. हा संदेश दुसऱ्याच्या नावे कार्डभिशी चालविणाऱ्याने गोपनीय पोलिसाच्या नावासमवेत पाठविल्याने मंडळाचे कार्यकर्तेही चक्रावून गेले.
वरिष्ठांसमोर मंडळांची गर्दी व्हावी, यासाठी पोलिसांकडून निरोप देताना बैठकीस गैरहजर राहिल्यास मंडळांना कोणताही परवाना दिला जाणार नाही, असा दम भरला गेला. त्यामुळे अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी भीतीपोटी या बैठकीस हजेरी लावली. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना पोलिसांनी सामंजस्यपणा आणि कर्तव्याची भूमिका पार पाडणे गरजेचे असताना दंडुकशाहीचा वापर करून सुरू असलेला प्रकार अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांना धक्कादायक वाटला. पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी बोलविलेल्या या बैठकीत कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय झाला नाही. त्यामुळे केवळ कागदपत्रे रंगविण्यासाठी ही बैठक झाली असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)