पोलिसांचे गृहप्रकल्प वेगाने साकारताहेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:24 AM2021-03-10T04:24:29+5:302021-03-10T04:24:29+5:30

कोल्हापूर : अवघी ३८० स्वेअर फुटांची अंधार कोठडी, आठ फूट उंची, गळके छप्पर आणि ढपले पडलेल्या गिलाव्याच्या भिंती असे ...

Police housing projects are being implemented fast ... | पोलिसांचे गृहप्रकल्प वेगाने साकारताहेत...

पोलिसांचे गृहप्रकल्प वेगाने साकारताहेत...

Next

कोल्हापूर : अवघी ३८० स्वेअर फुटांची अंधार कोठडी, आठ फूट उंची, गळके छप्पर आणि ढपले पडलेल्या गिलाव्याच्या भिंती असे विदारक चित्र असणाऱ्या पोलीस वसाहतींचे रुपडे पलटत आहे. शासनाकडून आलेल्या २८ कोटींच्या निधीमुळे आता चारपैकी बुधवार पेठेतील वसाहतीची जागा आता नव्या सुसज्ज सदनिका असणाऱ्या टुमदार इमारतींनी घेतली. बुधवार पेठेतील पोलिसांच्या गृहप्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. येथे तीन इमारतींचा सुमारे १६८ घरांचा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजच्या पोलीस वसाहती किमान शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत. तेथील अंधार कोठडीच्या स्वरूपातील घरे, अस्वच्छ वातावरण असे विदारक चित्र आहे. अशा परिस्थितीशी सामना करीत पोलीस आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात हे त्यांचे कौतुकच म्हणावे लागेल. २०१६ मध्ये तत्कालीन गृह विभागाचे अपर सचिव के.पी. बक्षी यांनी कोल्हापूरच्या भेटीवेळी त्यांना पोलीस वसाहतींची दुरवस्ता जाणवली. मुंबईत गेल्यानंतर त्यांनी तातडीने कोल्हापूर जिल्ह्यातील १३३९ पोलीस अंमलदारांना सुसज्ज व अद्ययावत घरे देण्याची घोषणाच केली. त्यानुसार कोल्हापूर शहरात पोलीस मुख्यालय, लक्ष्मीपुरी, बुधवार पेठ, तसेच इचलकरंजी या चारही जुन्या पोलीस वसाहतींच्या ठिकाणी नव्या गृहप्रकल्पांना मंजुरी दिली; पण हे काम निधीअभावी रखडले. तरीही तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर किमान बुधवार पेठेतील गृहप्रकल्पासाठी किमान २८ कोटींचा निधी खेचून आणला. बुधवार पेठेत सुमारे १९ हजार स्वेअर फूट अशा प्रशस्त जागेवर चार सुसज्ज इमारती उभारून तेथे किमान २०० सुसज्ज घरे उभारण्याचे नियोजन होते; पण तेथे चारपैकी फक्त तीन इमारतींच्या सुमारे १६८ घरांचे बांधकाम सुरू आहे. अतिशय वेगाने हे काम पूर्णत्वास जात आहे. अत्यंत सुंदर अशा देखण्या स्वरूपातील तीन टोलेजंग इमारती उभारत आहेत. सध्या त्यांच्या चौथ्या मजल्याचे काम सुरू आहे.

निधीअभावी गृहप्रकल्प अडकले

मंजूर प्रकल्पांपैकी पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी ६९७, लक्ष्मीपुरीतील जागेवर २००, बुधवार पेठेत २००, तर इचलकरंजीत २४२, अशा घरांची संख्या आहे; पण शासनाने निधी देण्यात आखडता हात घेतल्याने चारपैकी फक्त एकच गृहप्रकल्प साकारत आहे. इतर तीन गृहप्रकल्प मंजूर झाले, त्याच्या कामांच्या वर्कऑर्डरही निघाल्या, पण निधीअभावी ही घरे स्वप्नवत राहणार असल्याची शक्यता आहे.

बुधवार पेठेत एक इमारत गायब?

बुधवार पेठेतील १९ एकर प्रशस्त जुनी वसाहत व मैदानाच्या जागेवर चार इमारती मंजूर असून, त्यामध्ये किमान २०० सदनिका साकारणार होत्या. शासनाकडून निधीही आला. मग तीनच टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यामध्ये १६८ घरे साकारत आहेत. चौथ्या इमारतीच्या बांधकामाबाबत सारेच चिडीचूप का? असाही प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यांत चर्चिला जात आहे.

पॉइंटर...

जुनी पोलीस वसाहत, तेथील सध्या घरांची संख्या

- पोलीस मुख्यालय - ७१८

- बुधवार पेठ-८४

- लक्ष्मीपुरी-६०

- क. बावडा, भगवा चौक -५१

फोटो नं. ०९०३२०२१-कोल-पोलीस होम०१,०२,०३

ओळ : कोल्हापूर शहरात जुना बुधवार पेठेत १९ एकर प्रशस्त जागेवर पोलिसांचा गृहप्रकल्प वेगाने साकारत आहे. (छाया: नसीर अत्तार)

Web Title: Police housing projects are being implemented fast ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.