डॉल्बीमुक्तीसाठी पोलिसांचा पुढाकार

By admin | Published: August 25, 2016 12:14 AM2016-08-25T00:14:58+5:302016-08-25T00:51:31+5:30

गावात एकोप्याचा प्रयत्न : ‘एक गाव, एक गणपती’साठी जयसिंगपूर पोलिसांचे आवाहन

Police initiatives for dolbimukti | डॉल्बीमुक्तीसाठी पोलिसांचा पुढाकार

डॉल्बीमुक्तीसाठी पोलिसांचा पुढाकार

Next

संदीप बावचे --जयसिंगपूर --गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, ध्वनी प्रदूषण कायद्याची अंमलबजावणी करावी, असा संदेश देत जयसिंगपूर पोलिसांनी आता डॉल्बीमुक्तगणेशोत्सवाबरोबरच ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. हा उपक्रम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्येही राबविला जाणार आहे. समाज एकसंघ राहावा, भेदभाव नष्ट व्हावा, गावात एकोपा राहावा, या दृष्टिकोनातून पोलिस ठाण्याने या उपक्रमाचे पाऊल उचलले आहे.
समाजाचे प्रबोधन व्हावे, असा उदात्त हेतू घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याची सामाजिक चळवळ सुरू झाली. ही चळवळ अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. याच भावनेतून १२ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर ठाण्याने गणेशोत्सव कार्यकर्त्यांबरोबर ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक आयोजित करून यावर्षीही पोलिस ठाण्याच्या हद्दीत डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाबरोबरच ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्याबाबत पुढाकार घेतला आहे. जयसिंगपूरसह उदगाव, उमळवाड, कोथळी, दानोळी, कवठेसार, निमशिरगाव, तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर, चिपरी, आदी गावांत प्रबोधन केले आहे. गतवर्षीप्रमाणे कोथळी, उमळवाड, कोंडिग्रे ही गावे ‘एक गाव एक गणपती’साठी पुन्हा प्रतिसाद देतील, असा आशावाद पोलिसांनी आहे. गतवर्षी मंडळांनी सामाजिक बांधीलकी राखून गणेशोत्सव साजरा करावा, या पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळांनी दोन ते अडीच लाख रुपये दुष्काळी भागात निधी पाठविला होता. तसेच काही मंडळांनी जनावरांसाठी ओल्या चाऱ्याची सोय केली होती. तसेच धान्य, कपडे अशा स्वरूपातही मदत दिली होती. त्याप्रमाणे यावर्षीदेखील असा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉल्बीमुळे ध्वनी प्रदूषण होते, याची जाणीव गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना झाली आहे. डॉल्बीवर होणारा अफाट खर्च टाळून मंडळांनी विधायक कामासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. यामध्ये काही मंडळांनी तो उपक्रम हाती घेतला आहे. याला सर्वच मंडळांनी प्रतिसाद देणे गरजेचे आहे. यंदाही जयसिंगपूरसह परिसरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा होईल, असा आशावाद पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

निश्चितच प्रतिसाद देतील
विविध मंडळांनी गणरायाची स्थापना करणे आणि मिरवणुकीत ईर्ष्या निर्माण होऊन वादविवाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात एकोपा राहावा, या दृष्टिकोनातून ‘एक गाव, एक गणपती’बरोबरच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव गावांनी साजरा करावा. त्यासाठी पोलिस प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही जयसिंगपूरचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Police initiatives for dolbimukti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.