‘अवधूत’च्या पुनर्वसनासाठी पोलिसांचा पुढाकार
By admin | Published: April 24, 2016 12:59 AM2016-04-24T00:59:02+5:302016-04-24T00:59:02+5:30
दोन वर्षे सुधारण्याची संधी देण्यात येणार
कोल्हापूर : घरफोडी प्रकरणात अटक केलेला अवधूत ईश्वरा पाटील (वय १९, रा. देऊळवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) याच्या पुनर्वसनासाठी पोलिसांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला दोन वर्षे सुधारण्याची संधी देण्यात येणार आहे. तो सुधारला तर त्याला दहा वर्षे होणारी शिक्षाही माफ होणार आहे.
संशयित अवधूत पाटील याच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या, सोमवारी संपत आहे. त्याच्याकडून उर्वरित सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामुळे न्यायालयात हजर करून त्याला न्यायालयीन कोठडीची मागणी लक्ष्मीपुरी पोलिस करणार आहेत. त्यानंतर शाहूपुरी व राजारामपुरी पोलिस त्याचा ताबा घेतील. त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला जामिनावर बाहेर काढून दोन वर्षे सुधारण्याची संधी देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
त्याच्या आई-वडिलांना बोलावून खासगी वकील देण्यासाठी तुमची परिस्थिती नसेल तर सरकारी वकील देण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वासही पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी त्याला वैद्यकीय परीक्षेसाठी पुस्तकेही दिली आहेत. तो राजारामपुरी येथील कोठडीमध्ये अभ्यास करीत आहे.