पोलिस निरीक्षकासह दोघे लाच घेताना जाळ्यात
By admin | Published: September 24, 2016 12:51 AM2016-09-24T00:51:56+5:302016-09-24T00:51:56+5:30
इचलकरंजीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
इचलकरंजी : गुटखा व्यावसायिकाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करून कारवाई न करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येथील शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव बाबूराव गायकवाड (वय ५२, रा. मणेरे अपार्टमेंट, जवाहरनगर, मूळ गाव फुपेरे, ता. शिराळा) आणि पोलिसनाईक विष्णू रमेश शिंदे (४०, रा. केटकाळे गल्ली, इचलकरंजी) या दोघांना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
निरीक्षकपदाचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या प्रकाराने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस रेकॉर्डवरील गुटखा व्यावसायिक राजू लक्ष्मण पाच्छापुरे
(रा. जुना चंदूर रोड) याने तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार पाच्छापुरे याने पासपोर्टसाठी केलेला अर्ज पोलिस ठाण्यात पडताळणीसाठी आला आहे काय, याच्या चौकशीसाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आला होता. त्यावेळी पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी पाच्छापुरे याला तुझ्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पासपोर्टसंदर्भात अनुकूल अहवाल देता येणार नाही, असे सांगितले. त्याचबरोबर गुटखा धंद्याच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई न करण्याचे आणि धंद्याकडे दुर्लक्ष करतो, त्यासाठी मासिक ७५ हजार रुपये हप्ता देण्याचे सांगत शिंदे याला भेटण्याचा सल्ला दिला. त्यावेळी पाच्छापुरे हा शिंदे याला न भेटता निघून गेला होता. त्यानंतर शिंदे याने पाच्छापुरे याची दोन-तीनवेळा भेट घेत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पैसे केव्हा देतोस, अशी विचारणा केली. त्यावर पाच्छापुरे याने मी एकटाच गुटख्याचा धंदा करीत नसून, अन्य गुटखा व्यापारी आहेत. त्यांना घेऊनच साहेबांना भेटतो. त्यानंतर काय ते ठरव, असे सांगितले होते. २० सप्टेंबरला शिंदे याने पाच्छापुरे याची भेट घेऊन गायकवाड यांना द्यावयाच्या पैशांबाबत चर्चा केली. त्यावेळी २२ सप्टेंबरला गायकवाड यांची पोलिस ठाण्यात भेट घालून देण्याचे सांगितले होते. यासंदर्भात पाच्छापुरे याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार गुरुवारी पाच्छापुरे याने पंच, साक्षीदारांसह शिवाजीनगर ठाण्यात पोलिस निरीक्षक गायकवाड यांची भेट घेतली. त्यावेळी शिंदेही उपस्थित होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत तडजोडी अंती मासिक ६० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. शुक्रवारी पाच्छापुरे याच्या जुना चंदूर रोड येथील घरात जाऊन शिंदे हा ६० हजार रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. त्यावेळी शिंदे याने ही रक्कम ही पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्यासाठी स्वीकारल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस निरीक्षक गायकवाड यांनाही ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक उदय आफळे, पद्मा कदम, सहायक फौजदार मनोहर खणगावकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल श्रीधर सावंत, अमर भोसले, पोलिस नाईक मनोज खोत, संदीप पावलेकर, मोहन सौंदत्ती यांच्या पथकाने केली.
शिंदेच्या मालमत्तेची चौकशी आवश्यक
कारवाईत सापडलेला पोलिस विष्णू शिंदे हा शिवाजीनगर पोलिस ठाण्याचा ‘कलेक्टर’ म्हणून ओळखला जात होता. अनेक वर्षांपासून तो याठिकाणी ठिय्या मारून होता. या कालावधीत त्याने कोट्यवधीची माया गोळा केल्याची चर्चा पोलिस वर्तुळात ऐकायला मिळत आहे. त्याने नुकताच सर्वसुविधांनी युक्त असा टोलेजंग बंगला बांधला आहे. ही सर्व संपत्ती त्याच्याकडे कोठून आली, यासाठी त्याच्या संपूर्ण मालमत्तेची चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय पोलिसच असलेल्या शिंदे याच्या भावाची कारकीर्दही वादग्रस्त असून, त्याच्याही चौकशीची मागणी होत आहे.
बदली झाली तरी नोकरी येथेच
विष्णू शिंदे याची चार महिन्यांपूर्वी जयसिंंगपूर येथे बदली झाली आहे. मात्र, तो अद्यापही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होता. यामागे एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आणि राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आहे. मात्र, शुक्रवारच्या या कारवाईमुळे हा वरदहस्त त्याला चांगलाच भोवल्याचेही बोलले जात होते. शिंदे याच्याविरोधात अनेक तक्रारी पुढे येण्याची शक्यता असून, त्या अनुषंगानेही तपास होण्याची गरज आहे.
कारवाईने समाधान
विष्णू शिंदे याच्यावर कारवाई झाल्याचे समजताच पोलिस ठाण्यातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक पोलिसांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. याउलट त्याच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळलेल्या छोट्या-मोठ्या बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त होत होते.
शिंदेच्या घरातील ‘मुद्देमाल’ हलविल्याची चर्चा
विष्णू शिंदे लाच घेताना जाळ्यात अडकल्याचे वृत्त शहरात पसरताच गुन्हेगारी क्षेत्रातील अनेक गावगुंड विष्णू शिंदे राहत असलेल्या घराच्या कोपऱ्यावर जमले होते. यावेळी शिंदे याच्या घरातील काही ‘मुद्देमाल’ एका गाडीतून हलविला जात असल्याचीही चर्चा सुरू होती.