मलकापुरात पोलिसांची धडक मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:02+5:302021-04-20T04:26:02+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शाहूवाडी पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शाहूवाडी पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर मलकापूर येथे वाहनधारकांची कसून चौकशी केली जात असून, विना मास्क फिरणाऱ्यांवर पाचशे दंडाची आकारणी केली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढू लागला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष सतर्कता घेतली आहे. शासनाने सुरू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्यावर आता पोलिसांच्यावतीने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
या अनुषंगाने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील, मलकापूर या प्रमुख शहरात शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व वाहनधारकांची विशेषत: टू व्हीलर धारकांची कसून चौकशी केली जात आहे. मास्क धारण न करणाऱ्यांना पाचशे दंड आकारला जात आहे. या मोहिमेत पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका सराटे, श्री भोसले आदींसह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
विना मास्क फिरणारे त्याबरोबरच कारण नसताना विनाकारण गर्दी करणारे व इतरत्र फिरणारे यांच्यावरसुद्धा आता कारवाईचा बडगा सुरू झाला आहे. नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.