वृक्षतोडीबाबत लाचप्रकरणातील तक्रारदार मित्रासह पोलीसात हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:33 PM2020-01-20T12:33:20+5:302020-01-20T12:38:48+5:30
बांदिवडे (ता. पन्हाळा) येथील जंगलातील वृक्षतोडीबाबत लाचप्रकरणी वनरक्षक महेशकुमार आंबी यांच्याविरोधात तक्रार देऊन खोटे पुरावे रचणारा संशयित तक्रारदार अभिमन्यू अर्जुन पाटील (वय ३५, रा. बांदिवडे) व त्याचा साथीदार अमित बाळासो येडगे (२७, रा. कणेरीपैकी धनगरवाडा, ता. पन्हाळा) हे दोघेजण स्वत:हून शिरोली एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात सोमवारी हजर झाले.
कोल्हापूर : बांदिवडे (ता. पन्हाळा) येथील जंगलातील वृक्षतोडीबाबत लाचप्रकरणी वनरक्षक महेशकुमार आंबी यांच्याविरोधात तक्रार देऊन खोटे पुरावे रचणारा संशयित तक्रारदार अभिमन्यू अर्जुन पाटील (वय ३५, रा. बांदिवडे) व त्याचा साथीदार अमित बाळासो येडगे (२७, रा. कणेरीपैकी धनगरवाडा, ता. पन्हाळा) हे दोघेजण स्वत:हून शिरोली एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात सोमवारी हजर झाले.
संशयित तक्रारदार अभिमन्यू पाटील यांनी पन्हाळा विभागातील वनरक्षक महेशकुमार बाबूराव आंबी यांनी २००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार १८ सप्टेंबर २०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूरकडे संपर्क साधून नोंदविली होती.
कारवाईवेळचा आंबी यांचा ध्वनिमुद्रित आवाज व पडताळणीवेळी ध्वनिमुद्रित असलेला आवाज यांमध्ये तफावत जाणवली. त्यावर प्रत्यक्ष हॉटेल श्रावणी येथे जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
त्यामध्ये आंबी हजर नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच तक्रारदार अभिमन्यू पाटील व त्यांचा मित्र अमित येडगे हे या हॉटेल परिसरात बोलत असल्याचे कॅमेऱ्यात दिसले. तसेच जप्त केलेल्या मेमरी कार्डमधील संभाषणाचा पुणे प्रादेशिक न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात आंबी यांच्या अहवालात अमित येडगे हा तक्रारदाराशी बोलण्याचे निष्पन्न झाले.
खोटे पुरावे रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची फसवणूक केलेप्रकरणी संशयित पाटील व येडगे यांचे विरोधात शिरोली एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झालेपासून दोघेजण पसार होते.
सोमवारी ते सकाळी अकराचे सुमारास शिरोली पोलीस ठाण्यात हजर झाले. येथील पोलीसांनी एसीबीला कळविलेनंतर त्यांच्या टिमने त्यांना ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत त्यांचेकडे कसून चौकशी करीत आहेत.